
एटापल्ली : रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधून उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तथा पोलीस स्टेशन एटापल्ली येथे सावित्रीच्या लेकी विकास संस्था, एटापल्ली व दक्षता समिती, एटापल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात पार पडला. देशाची सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांना राखी बांधून त्यांच्या सेवेला सलाम करण्यात आला.
रक्षाबंधन हा केवळ बहीण-भावाच्या नात्याचा सण नसून परस्पर विश्वास, संरक्षण, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी जपणारा सण आहे. याच भावनेतून सावित्रीच्या लेकी विकास संस्था आणि दक्षता समितीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पोलीस बांधवांना राखी बांधत त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. दुर्गम आणि संवेदनशील भागात पोलीस अधिकारी व कर्मचारी अनेकदा सण-उत्सव, कुटुंबीय आणि वैयक्तिक सुखसोयी बाजूला ठेवून कर्तव्य बजावत असतात. अशा पोलीस जवानांच्या त्यागाची आणि सेवाभावाची जाणीव ठेवत हा उपक्रम राबविण्यात आला.
या सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन सौ. पौर्णिमा शैलेश श्रीरामवार, अध्यक्षा, सावित्रीच्या लेकी विकास संस्था, सौ. सुनीता मोहन चांदेकर, अध्यक्षा, दक्षता समिती सौ. छाया सम्मा जेट्टी यांच्या पुढाकाराने करण्यात आले. यावेळी सौ. मनीषा नाडमवार, श्रीमती जयाताई पुडो आणि सौ. सरीता देवरकोंडावार यांचीही उपस्थिती होती.

महिलांनी पोलीस बांधवांच्या मनगटावर राखी बांधून त्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी आणि निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. पोलीस बांधवांनीही या भावनिक उपक्रमाबद्दल महिलांचे आभार मानले. या उपक्रमामुळे पोलीस विभाग आणि समाजातील आपुलकीचा व विश्वासाचा धागा अधिक दृढ झाला.
एटापल्लीसारख्या दुर्गम भागात पोलीस यंत्रणा कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सातत्याने कार्यरत असते. नैसर्गिक आपत्ती, संवेदनशील परिस्थिती, सण-उत्सव अथवा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती असो, पोलीस जवान तत्परतेने सेवा बजावत असतात. त्यांच्या या निस्वार्थ सेवेला समाजाकडून मिळणारा सन्मान आणि आपुलकी निश्चितच त्यांचे मनोबल वाढविणारी आहे.
राखीच्या माध्यमातून पोलीस बांधवांना केवळ शुभेच्छाच नव्हे, तर “आपल्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र झटणाऱ्या प्रत्येक पोलीस जवानासोबत संपूर्ण समाज खंबीरपणे उभा आहे”, असा विश्वास या उपक्रमातून व्यक्त करण्यात आला. त्यामुळे एटापल्ली पोलीस स्टेशनमध्ये पार पडलेला हा रक्षाबंधन सोहळा सामाजिक बांधिलकी आणि बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा सुंदर संदेश देणारा ठरला.

