
अमरावती – अमरावती जिल्ह्यात नावाजलेली दीपशिखा गुरुकुल सैनिक स्कूल पुन्हा एकदा वादात आली आहे. पालकांनी असा आरोप केला आहे की, शाळेच्या मेसमध्ये दिले जाणारे जेवण निकृष्ट दर्जाचे आहे ज्यामुळे मुलांची तब्येत बिघडली आणि अनेक विद्यार्थ्यांना विषबाधेचा त्रास सहन करावा लागला आहे पालकांचे म्हणणे आहे की, लाखो रुपये फी आकारूनही शाळा प्रशासन मुलांच्या आरोग्याशी खेळ करत आहे.
तक्रारदार पालकांनी हादेखील आरोप केला आहे की मेस चालक आणि शाळा प्रशासन यांच्यात संगनमत असल्यामुळे अन्नाच्या गुणवतेकडे लक्ष दिले जात नाही. फी आणि प्रतिष्ठेच्या नावाने जिल्ह्यात प्रसिद्ध असलेली ही शाळा आता पालकांच्या रोषाला व अविश्वासाला सामोरे जात आहे. पालकांनी प्रशासनाकडे तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या शाळेत एका वर्षासाठी जवळपास सत्तर हजार रुपये फी आकारली जाते. पण येथे ‘नाव मोठे पण दर्शन छोटे अशी परिस्थिती आहे. विद्यार्थ्यांना दोन वेळचे जेवण सुद्धा अत्यंत निकृष्ट दर्जाचे दिले जाते. अभ्यासाच्या नावाखाली विद्याथ्यांच्या जिवाशी खेळ केला जात आहे. त्यामुळे मुलामध्ये वारंवार पोटाच्या आजारांत वाढ होत आहे. याकडे तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. याबाबत मुख्याध्यापक राजेंद्र चर्जन म्हणाले की, पावसाळ्याच्या दिवसांत पाण्यामुळे पोटाचे आजार होतात. यासाठी विद्यार्थ्यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच शाळेच्या मेसमध्ये वॉटर फिल्टर व स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जाते. आतापर्यंत विषबाधेसारखा कोणताही प्रकार घडलेला नाही. गेल्या काही दिवसांत काही विद्यार्थ्यांना अपचनाचा त्रास झाला होता, त्यासाठी त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

