
प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; सर्व शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन
जिल्हा प्रतिनिधी |नितेश गट्टीवार
गडचिरोली | दि. १९ ऑगस्ट २०२६ : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात नव्याने रुजू झालेले शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रेरक उजागरे तसेच उपशिक्षणाधिकारी परसावार यांची महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती प्राथमिक शिक्षक संघटना, जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने सदिच्छा भेट घेऊन शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसह शिक्षकांना भेडसावणाऱ्या प्रमुख अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शिक्षकांच्या समस्या प्रशासनाच्या माध्यमातून तातडीने मार्गी लावण्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्याची मागणी शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
यावर नवनियुक्त शिक्षणाधिकारी प्रेरक उजागरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, लवकरच जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येईल, असे सांगितले. या बैठकीत प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची माहिती घेऊन ते सोडविण्यासाठी प्रभावी व सकारात्मक प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर, प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष योगेश ढोरे, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक देशमुख, आदर्श शिक्षक समितीचे जिल्हाप्रमुख प्रदीप सेलोकर, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुरुदेव नवघडे यांच्यासह जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच धनपाल मिसार, राजेश चिल्लमवार, बापू मुनघाट, धनेश कुकडे, अमरदिप भुरले, आशिष धात्रक, देव लांजेवार, लोमेश उंदीरवाडे, साईनाथ अलोणे, राजेश बाळराजे, राजेंद्र भुरसे, डंबेश पेंदाम, सुनील मेंढे, प्रशांत काळे, राकेश रोकडे, राकेश सोनटक्के आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
नवनियुक्त शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक आणि सहकार्याची भूमिका घेतल्याने जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या समस्या लवकरच मार्गी लागतील, अशी अपेक्षा शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे नव्या शैक्षणिक प्रशासनाकडून शिक्षकांना मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.

