
मोठमोठे ओंडके नदीपात्रात; जेसीबी–फोकलीनच्या वापराचा आरोप, स्वतंत्र चौकशीची मागणी
अमित कत्तीवार | विशेष जिल्हा प्रतिनिधी
अहेरी : आलापल्ली वन विभागांतर्गत येणाऱ्या पेडीगुडम वनपरिक्षेत्रातील मुलचेरा तालुक्यातील उदयनगर–मुलचेरा मार्गावरील दीना नदीकाठावर मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याचा प्रकार समोर आल्याने वनविभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नदीकाठावर अनेक मोठी झाडे तोडून त्यांचे ओंडके, फांद्या आणि लाकडाचे अवशेष परिसरात टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले असून, काही ओंडके थेट नदीपात्रात पडलेले असल्याचे सांगण्यात येत आहे. या कथित वृक्षतोडीसाठी जेसीबी आणि फोकलीनसारख्या अवजड यंत्रांचा वापर झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे हा प्रकार नेमका कशासाठी करण्यात आला आणि त्याला संबंधित विभागाची परवानगी होती का, याची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

पेडीगुडम वनपरिक्षेत्रात गोमणी, येलचील, मुकडी आणि मुलचेरा अशी चार उपक्षेत्रे असून वनपरिक्षेत्र अधिकारी, क्षेत्र सहाय्यक आणि वनरक्षकांची यंत्रणा कार्यरत आहे. एवढी मोठी प्रशासकीय यंत्रणा उपलब्ध असतानाही जंगल परिसरात मोठ्या आकाराची झाडे तोडली जात असतील आणि त्यासाठी अवजड यंत्रसामग्रीचा वापर होत असेल, तर संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना याची माहिती कशी मिळाली नाही, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. जंगलाचे संरक्षण करणे, नियमित गस्त घालणे, अवैध वृक्षतोड रोखणे आणि वनसंपत्तीची हानी करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करणे ही वनविभागाची जबाबदारी आहे. मात्र दीना नदीकाठावरील परिस्थिती पाहता वनविभागाची गस्त प्रत्यक्षात सुरू आहे की केवळ कागदोपत्री नोंदी केल्या जात आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मोठमोठी झाडे तोडण्यासाठी आणि त्यांचे ओंडके हलविण्यासाठी जेसीबी किंवा फोकलीनसारख्या यंत्रांचा वापर झाल्याचा आरोप गंभीर मानला जात आहे. अशी यंत्रे वनक्षेत्रात आणताना वाहनांची ये-जा, कामासाठी होणारी हालचाल आणि वृक्षतोडीचा आवाज याकडे संबंधित कर्मचाऱ्यांचे लक्ष गेले नाही का, असा सवालही केला जात आहे. हा प्रकार एखाद्या अधिकृत विकासकामाचा भाग होता का, संबंधित कामासाठी कोणती परवानगी देण्यात आली होती का किंवा कोणत्याही परवानगीशिवाय जंगलातील झाडांची तोड करण्यात आली, याचा खुलासा वनविभागाने करणे गरजेचे आहे.
दीना नदीच्या काठावर आणि नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर तोडलेली झाडे व ओंडके आढळल्याने संशय अधिक बळावला आहे. परिसरात काही दिवसांपूर्वी बंधाऱ्याचे काम सुरू असल्याने नागरिकांची तेथे ये-जा झाली असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आल्याचे सांगण्यात येते. सामान्य नागरिकांना सहजपणे दिसणारी एवढ्या मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड नियमित गस्त घालणाऱ्या वनकर्मचाऱ्यांच्या नजरेतून कशी सुटली, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. संबंधित भागाची पाहणी यापूर्वी करण्यात आली होती का, गस्तपुस्तिकेत त्याची नोंद आहे का आणि वृक्षतोडीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल देण्यात आला आहे का, याची तपासणी करण्याची मागणी होत आहे.
या परिसरातील वनसंपदेची वास्तविक स्थिती स्पष्ट करण्यासाठी वनविभागाने अधिकृत वननकाशे, जुन्या नोंदी आणि उपग्रह छायाचित्रांच्या आधारे तपासणी करावी, अशी मागणीही पुढे आली आहे. पूर्वीच्या तुलनेत सध्या किती वृक्षसंपदा कमी झाली आहे, किती झाडे तोडण्यात आली, त्यातील प्रजाती कोणत्या आहेत, त्यांचे अंदाजे वय आणि बाजारमूल्य किती आहे, तसेच तोडलेले लाकूड नेमके कुठे नेण्यात आले, याचा शोध घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर घटनास्थळी वापरण्यात आलेल्या जेसीबी व फोकलीनची माहिती, संबंधित यंत्रमालक, वाहनांची हालचाल आणि कथित कामासाठी असलेल्या परवानग्यांची पडताळणी केल्यास या प्रकरणाचे सत्य समोर येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पेडीगुडम वनपरिक्षेत्रातील काही अधिकारी-कर्मचारी नियुक्त मुख्यालयी न राहता आष्टी, अहेरी किंवा आलापल्ली येथून ये-जा करीत असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर आहे. या चर्चेत तथ्य आहे की नाही, याचीही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे पडताळणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दुर्गम वनक्षेत्राच्या सुरक्षेसाठी नियुक्त कर्मचारी मुख्यालयी उपस्थित नसतील, तर अवैध वृक्षतोड, लाकूड तस्करी आणि इतर वनगुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे कठीण होऊ शकते, अशी नागरिकांची भूमिका आहे. यापूर्वी या वनपरिक्षेत्रातील एका अधिकाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई झाल्याच्या पार्श्वभूमीवर सद्य प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी आणखी तीव्र झाली आहे.
वनसंपत्ती ही सार्वजनिक आणि पर्यावरणीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची संपत्ती असल्याने दीना नदीकाठावरील कथित वृक्षतोडीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पंचनामा करावा, तोडलेल्या झाडांची संख्या व प्रजाती निश्चित कराव्यात, गस्त नोंदी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती तपासावी तसेच संबंधित यंत्रसामग्री व लाकडाच्या वाहतुकीची माहिती गोळा करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तपासणीत बेकायदेशीर वृक्षतोड झाल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधित व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याबरोबरच कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जंगलाच्या संरक्षणासाठी स्वतंत्र यंत्रणा, अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असताना दिवसाढवळ्या मोठमोठी झाडे तोडली जात असतील, तर या प्रकारामागे नेमके कोणाचे दुर्लक्ष किंवा संरक्षण आहे, याचा छडा लागणे आवश्यक आहे. दीना नदीपात्रातील ओंडके आणि वृक्षतोडीचे अवशेष आता केवळ पर्यावरणाच्या हानीचे चिन्ह नसून वनविभागाच्या गस्तीपासून ते प्रशासकीय जबाबदारीपर्यंत अनेक प्रश्न उपस्थित करणारा मुद्दा ठरला आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विलंब न करता चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी जोरदार मागणी होत आहे.

