
अमित कत्तीवार | विशेष जिल्हा प्रतिनिधी
एटापल्ली, (गडचिरोली) : एटापल्ली शहरातील अवास्तव व चुकीची वीजबिले, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, स्मार्ट मीटरची सक्ती, अपुरे तांत्रिक मनुष्यबळ तसेच विविध प्रलंबित विद्युत समस्यांविरोधात आज नगर पंचायत एटापल्लीच्या पुढाकाराने नगराध्यक्ष रेखा गजानन मोहुर्ले यांच्या नेतृत्वाखाली, नगरसेवक राघवेंद्र सुल्वावार यांच्या पुढाकाराने नगर पंचायतचे पदाधिकारी, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
संविधान चौकातून निघालेला मोर्चा महावितरण उपविभाग कार्यालय, एटापल्ली येथे पोहोचल्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) चे उपअभियंता यांना विविध मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनामध्ये एटापल्ली शहरातील सर्व अवास्तव व चुकीची वीजबिले तात्काळ रद्द करून फेरतपासणी करणे, प्रत्येक ग्राहकाचे नियमित प्रत्यक्ष मीटर रीडिंग घेऊनच वीजबिले देणे, अंदाजे बिलांची पद्धत बंद करणे, शहराला २४×७ अखंड व दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध करून देणे, जीर्ण वीजवाहिन्या, ट्रान्सफॉर्मर व विद्युत यंत्रणांची तातडीने दुरुस्ती करणे, स्मार्ट मीटरची सक्ती थांबविणे, विशेष तक्रार निवारण शिबिर आयोजित करणे, एटापल्ली शहराचे महावितरणच्या नोंदीतील ग्रामीण वर्गीकरण रद्द करून शहरी वर्गीकरण करणे, अतिरिक्त लाईनमन व तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, तसेच जिल्हा वार्षिक आदिवासी विकास उपयोजना अंतर्गत प्रस्तावित पाच ट्रान्सफॉर्मरना तातडीने मंजुरी मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करणे अशा विविध महत्त्वपूर्ण मागण्या करण्यात आल्या.
याशिवाय सूरजागड औद्योगिक प्रकल्पासाठी असलेल्या १३२ के.व्ही. वीजवाहिनीमध्ये बिघाड झाल्यास एटापल्ली शहराचा संपूर्ण वीजपुरवठा विस्कळीत होत असल्याने शहरासाठी स्वतंत्र अथवा पर्यायी १३२ के.व्ही. वीजपुरवठा व्यवस्था निर्माण करण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांच्या न्याय्य मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन आवश्यक कार्यवाही न झाल्यास भविष्यात अधिक तीव्र स्वरूपाचे लोकशाही मार्गाने आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देखील देण्यात आला.
या जनआक्रोश मोर्चामध्ये नगराध्यक्ष रेखा गजानन मोहुर्ले, नगरसेवक राघवेंद्र सुल्वावार, पाणीपुरवठा सभापती राहुल कुळमेथे, नगरसेविका निर्मला नल्लावार, सामाजिक कार्यकर्ते बंटी मोहुर्ले, प्रसाद पुल्लूरवार, सुरेखा मूलकावार, पूजा पुल्लूरवार, प्रसाद राजकोंडावार, अनिकेत मामीडवार, ओमकार मोहुर्ले, गणेश खेडेकर, विजय सुंकेपाकवार, नरेश रामटेके, छाया मामीडवार, मनिषा राजकोंडावार, रोहिदास भुरसे, पुंडलिक मानापुरे, दीपक फुलसंगे, सुनीता चांदेकर यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच एटापल्ली शहरातील मोठ्या संख्येने महिला-पुरुष नागरिक सहभागी झाले होते.
महावितरण कार्यालयावर काढण्यात आलेल्या या जनआक्रोश मोर्चामुळे एटापल्ली शहरातील वीज समस्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, नागरिकांच्या न्याय्य मागण्यांवर महावितरण प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

