
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील मुधोली (चक नं. २) परिसरातील शेतकऱ्यांनी वरद फेरो कंपनीच्या प्रस्तावित प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवत सुपीक शेतजमिनी देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मात्र, शेतकऱ्यांचा विरोध दडपण्यासाठी काही निवडक शेतकऱ्यांना लक्ष्य करून त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केला आहे.
शेतजमीन ही केवळ मालमत्ता नसून शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आणि कुटुंबाच्या भविष्याचा आधार आहे. जमीन गेल्यास शेतकऱ्यांचा रोजगार, उत्पन्न आणि पुढील पिढ्यांचा आधार हिरावला जाण्याची भीती आहे. त्यामुळे आपल्या हक्काच्या जमिनीसाठी शेतकरी लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहेत.

“शांततेच्या मार्गाने आपल्या सुपीक शेतजमिनी वाचवण्यासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांवर चुकीचे गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी प्रशासनाला दिला आहे.
गुन्हे दाखल करून आवाज दाबू नका!
प्रशासनाने कोणत्याही शेतकऱ्यावर अन्यायकारक अथवा चुकीचे गुन्हे दाखल करू नयेत. तसेच आंदोलन दडपण्यासाठी दबावतंत्राचा वापर करू नये, अशी मागणी ब्राह्मणवाडे यांनी केली आहे.
“शेतकऱ्यांवर अन्याय सुरूच राहिला, तर हजारो शेतकऱ्यांसह ‘जेल भरो’ आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, सुपीक शेतजमिनी वाचविण्याच्या मुद्द्यावरून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत असून, आता हा लढा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. प्रशासन शेतकऱ्यांची भूमिका समजून घेऊन सकारात्मक तोडगा काढणार की आंदोलनाला सामोरे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

