
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली, दि. ४ ऑगस्ट : गडचिरोली जिल्हा जनसेवा सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला ‘समाजरत्नांचा भव्य सत्कार सोहळा’ आज गोंडवाना सैनिक विद्यालय, वाकडी येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभाऊ वासेकर होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम, जिल्हाध्यक्षा, राष्ट्रवादी युवती काँग्रेस तथा सिनेट सदस्य, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी रवींद्र अल्लोलवार (माजी जिल्हा परिषद अध्यक्ष), मोहम्मद युनूस शेख (महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा नगरसेवक, वडसा-देसाईगंज), नंदू नरोटे (प्रादेशिक कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, गडचिरोली जिल्हा), प्रमोद वैद्य (माजी नगराध्यक्ष), रिंकुभाऊ पापडकर (सचिव, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस), रवी मेश्राम (नगरसेवक), प्रतिभा कुमरे (नगरसेविका), मंगरे मॅडम तसेच अंजुम सय्यद हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमात महिला सक्षमीकरण, कृषी, क्रीडा, अल्पसंख्याक समाजसेवा आणि विद्यार्थी या क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले.
या सोहळ्यास विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान हा समाजाला प्रेरणा देणारा असून, अशा उपक्रमांमुळे सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होते, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, जिल्हा गडचिरोली यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आलेला हा सत्कार सोहळा उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडला.

