
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली/चामोर्शी,दि.२६ जूलै : राहुल लोक विकास मंडळ द्वारा संचालित यशोधरा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, चामोर्शी येथे विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक लोकशाही पद्धतीने आणि अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची भावना, लोकशाही मूल्यांची जाणीव आणि सामाजिक बांधिलकी विकसित व्हावी या उद्देशाने या निवडणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
निवडणुकीसाठी विविध पदांवर विद्यार्थ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. प्रचारासाठी सर्व उमेदवारांना निश्चित कालावधी देण्यात आला. मतदानाच्या दिवशी सकाळपासूनच शाळेच्या परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. शिक्षकांच्या देखरेखीखाली गुप्त मतदान पद्धतीने संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पडली. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध रांगेत उभे राहून आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करून लोकशाहीचा अधिकार बजावला.

मतमोजणीनंतर जाहीर झालेल्या निकालात अनमोल बुरांडे यांची शाळा नायक, पीयूष चिचघरे यांची शाळा उपनायक, वेदांत कोठारे यांची क्रीडा प्रमुख, जानवी पासांडे व भूपेश्वरी कुत्तरमारे यांची सांस्कृतिक प्रमुख, खोजेंद्र बारसागडे यांची आरोग्य व स्वच्छता प्रमुख, गायत्री कुकडकर यांची सहल प्रमुख, तृप्ती मेश्राम यांची शालेय शिक्षण प्रमुख, खुशी धोडरे यांची विद्यार्थिनी प्रतिनिधी आणि मीनाक्षी कोठारे यांची शालेय पोषण आहार प्रमुख म्हणून निवड झाली.
तसेच विविध विभागांच्या उपप्रमुखपदी यश गव्हारे, जानवी बावणे, पाहुणी बुरांडे, साक्षी बुरांडे, प्रेम बुरांडे, अर्तिक्षा किरमे आणि अंश चलाख यांची लोकशाही मार्गाने निवड करण्यात आली. निवडून आलेल्या सर्व विद्यार्थी प्रतिनिधींना शपथ देऊन त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या निवडणुकीमुळे विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. नेतृत्व, सहकार्य, शिस्त, जबाबदारी, निर्णयक्षमता आणि सामाजिक उत्तरदायित्व यांसारख्या मूल्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून आत्मसात केले. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक आणि अनुकरणीय वातावरणात पार पडली.
हा उपक्रम प्राचार्य शाम रामटेके व वरिष्ठ शिक्षक राजू धोडरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला. यावेळी शाळेतील शिक्षक गुरुदेव सातपुते, लोकनाथ दुधबळे, प्रवीण नैताम, नीलेश शिरसागर, जयश्री कोठारे, दीपाली घोंगडे, अमोल उंदिरवाडे तसेच शाळेतील इतर शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची रुजवणूक करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम सर्वांच्या सहभागामुळे यशस्वी ठरला असून, निवडून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींकडून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी कार्य होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

