
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली, दि. १८ जूलै : गडचिरोली जिल्ह्यातील वन, वन्यजीव संवर्धन, शेतकरी संरक्षण आणि पर्यावरण विकासाशी संबंधित विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर आमदार रामदास मसराम यांनी गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक गजेंद्र नरवणे यांची सदिच्छा भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. जिल्ह्यातील नागरिक, शेतकरी आणि वनक्षेत्राशी निगडित समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
बैठकीत हत्तींच्या वाढत्या वावरामुळे पिके, घरे आणि इतर मालमत्तेचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने व योग्य भरपाई देण्याची मागणी करण्यात आली. तसेच वन्यप्राणी रस्ता ओलांडताना होणाऱ्या अपघातांमध्ये जखमी अथवा मृत्यू झालेल्या नागरिकांना शासनाकडून निश्चित मदत व भरपाई देण्यासाठी स्पष्ट आणि प्रभावी धोरण राबविण्याची आवश्यकता त्यांनी मांडली.

याशिवाय, जिल्ह्यातील हत्तींच्या हालचालींवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांचे अचूक लोकेशन ट्रॅकिंग, नागरिकांना वेळेवर सूचना देणारी यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर देण्याची सूचना करण्यात आली.
जंगलालगतच्या शेतीचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी सोलर ऊर्जा कुंपण, फेन्सिंग तार तसेच नैसर्गिक कुंपण उभारण्याची मागणीही आमदार मसराम यांनी केली. वघाळा परिसरात पक्षी संवर्धन व संरक्षणासाठी विशेष उपाययोजना राबविणे, तसेच कोरची तालुक्यातील टिपागड पर्यटन व विकास प्रकल्पाला गती देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
गडचिरोली जिल्ह्यातील वनसंपदा, वन्यजीव संवर्धन, शेतकरी हित आणि पर्यावरण विकासाच्या दृष्टीने विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली असून, संबंधित प्रश्नांवर आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्य वनसंरक्षक गजेंद्र नरवणे यांनी दिल्याची माहिती मिळाली.

