
गडचिरोली|नितेश गट्टीवार
चामोर्शी,दि.१ जूलै:मारोडा ग्रामपंचायतीने अप्पर तहसील कार्यालयाशी संबंधित प्रस्तावाला विरोध दर्शवत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे. अप्पर तहसील कार्यालय आष्टी येथे समाविष्ट करण्याऐवजी मारोडा ग्रामपंचायत चामोर्शी तहसील कार्यालयातच कायम ठेवण्यात यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतीने दिलेल्या निवेदनानुसार, महसूल मंडळ येनापूर अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायत मारोडाचा अप्पर तहसील कार्यालय आष्टी येथे समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, मारोडा ते आष्टी हे अंतर सुमारे ३५ किलोमीटर, तर मारोडा ते चामोर्शी हे अंतर केवळ ७ किलोमीटर असल्याने नागरिकांना आष्टी येथे जाणे गैरसोयीचे ठरणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

त्यामुळे ग्रामपंचायत मारोडाचा समावेश अप्पर तहसील कार्यालय आष्टी येथे न करता, विद्यमान तहसील कार्यालय चामोर्शी येथेच कायम ठेवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर ग्रामपंचायत मारोडाचे प्रशासक तसेच ग्रामपंचायत यांच्या स्वाक्षऱ्या असून ग्रामपंचायत सदस्यांचाही पाठिंबा दर्शविण्यात आला आहे. ग्रामस्थांच्या सोयीचा विचार करून प्रशासनाने योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

