
निपुण भारत, शैक्षणिक गुणवत्ता, नवोदय-शिष्यवृत्ती व विविध शैक्षणिक उपक्रमांवर मार्गदर्शन.

एटापल्ली: तालुक्यातील कसनसूर केंद्रांतर्गत केंद्रस्तरीय शिक्षण परिषद हालेवारा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, तसेच शिक्षकांच्या शैक्षणिक कार्याला अधिक प्रभावी दिशा मिळावी, या उद्देशाने विविध शैक्षणिक विषयांवर या परिषदेत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी हालेवारा येथील उपसरपंच संध्याताई कन्नलवार होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून बीआरसी एटापल्लीचे श्री. सुरज उत्तरवार, श्री. नागमोते सर, श्री. प्रवीण चन्नावार सर आणि श्री. सचिन वाकडे सर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सावित्रीबाई फुले व माता सरस्वती यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून कसंन्सूर केंद्रात नव्याने दाखल झालेल्या शिक्षकांचेही मान्यवरांच्या हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आला.
परिषदेत नवोदय विद्यालय व शिष्यवृत्ती परीक्षेच्या सरावाबाबत श्री. सचिन वाकडे यांनी मार्गदर्शन केले. श्री. नरोटे यांनी मागील शिक्षण परिषदेचा इतिवृत्तांत सादर केला. निपुण भारत अंतर्गत निपुण महाराष्ट्र, पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कृती कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत श्री. सुरज उत्तरवार व श्री. भाग्यवान शेंडे यांनी सविस्तर माहिती दिली.
यावेळी पीजीआय व यू-डायस प्लस याबाबत लांडे सरांनी मार्गदर्शन केले. शैक्षणिक क्षेत्रभेटीचे नियोजन आणि त्रैमासिक पालक सभा या विषयावर श्री. सोमनाथ उतापते यांनी सादरीकरण केले. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी कोणत्या पद्धतींचा वापर करता येईल, याबाबत मोहुर्ले सरांनी मार्गदर्शन केले. तसेच शाळा व्यवस्थापन समिती (एसएमसी) पुनर्गठनाबाबत श्री. बाबुराव गोटे यांनी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
शैक्षणिक साहित्याचे व्यवस्थापन व प्रभावी वापर या विषयावर श्री. निखिल बर्डे यांनी शिक्षकांच्या कृतीयुक्त सहभागातून हितगुज केले. समग्र प्रगती पत्रक (HPC) याबाबत श्री. मुकेश धोंगडे यांनी सादरीकरण केले. तर डॉ. जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमाची माहिती श्री. रंजीत उंदीरवाडे यांनी दिली. इयत्ता तिसरी व चौथी कार्यशिक्षण तसेच इयत्ता सहावी व्यावसायिक शिक्षणाच्या अंमलबजावणीचे महत्त्व श्रीकृष्ण उरकुडे यांनी स्पष्ट केले.
यावेळी मार्गदर्शन करताना श्री. सुरज उत्तरवार यांनी कसंन्सूर केंद्रातील सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांनी ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. केंद्राची शैक्षणिक गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम ठेवत केंद्राचा नावलौकिक वाढविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हालेवारा शाळेचे मुख्याध्यापक श्री. बडा सर, कु. लक्ष्मी किरसाण मॅडम, शाळेतील विद्यार्थी तसेच ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रानू वाचामी सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. सचिन वाकडे सर यांनी केले. शेवटी ‘वंदे मातरम्’ गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

