
प्रतिनिधी | न्यूज जागर
चामोर्शी, दि. २४ : चामोर्शी शहरातील आष्टी कॉर्नर परिसरात बुधवारी सकाळी सुमारे १०.४५ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले. अपघातास कारणीभूत ठरलेल्या जेसीबी चालकाविरुद्ध चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निखिल विजय देशमुख (२४, रा. फराडा), विनोद देशमुख आणि संतोष किंनेकर हे दुचाकीने प्रवास करीत असताना आष्टी कॉर्नर येथील हनुमान मंदिराजवळ समोरून येणाऱ्या जेसीबीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले.

स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. निखिल देशमुख यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. उर्वरित दोघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
तपासादरम्यान जेसीबी चालक सुनिल अन्सारी (रा.मुशहरी, बिहार) याच्याकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ३१५/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील संबंधित कलमे तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ व १९९-अ अन्वये कारवाई करण्यात येत आहे.
पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खोब्रागडे करीत आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे चामोर्शी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

