Casualty in illegal sand mining! Man dies under a loader at Sindrai Ghat

श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
प्रकरण दडपण्याचा प्रयत्न; प्रशासनाची भूमिका संशयास्पद
तालुक्यातील कोंडाळा परिसरातील सिंड्राई रेती घाटावर सुरू असलेल्या कथित अवैध रेती उत्खननादरम्यान एका इसमाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. उत्खननासाठी वापरल्या जाणाऱ्या लोडर वाहनाखाली दबून संबंधिताचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे.

घटना भर दिवसा घडल्याचे सांगितले जात असताना, अपघातानंतर प्रकरण दडपण्याचे प्रयत्न झाल्याची जोरदार चर्चा परिसरात रंगली आहे. घटनेनंतर संबंधित यंत्रसामग्री हटविणे, माहिती गुप्त ठेवणे आणि प्रशासनाला विलंबाने कळविणे अशा हालचाली झाल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
मृत व्यक्तीची ओळख, अपघाताची नेमकी वेळ, तसेच लोडर चालक व घाट मालकाची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. यामुळे या संपूर्ण प्रकरणाभोवती संशयाचे सावट गडद झाले आहे. पोलीस व महसूल विभागानेही अद्याप अधिकृत भूमिका न मांडल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. #newsjagar
दरम्यान, सिंड्राई घाटावर अवैध रेती उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी यापूर्वीही करण्यात आल्या होत्या. तरीही संबंधित यंत्रणेकडून ठोस कारवाई न झाल्यानेच अशा दुर्घटना घडत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, प्रकरणाची तात्काळ व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

