
प्रतिनिधी | न्यूज जागर
चामोर्शी, दि. २४ जून :चामोर्शीतील आष्टी कॉर्नर परिसरात बुधवारी सकाळी १०:४५ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर अन्य दोघेजण जखमी झाले आहेत. जेसीबी चालक सुनिल मुस्तफा अन्सारी वय १८ रा.मुशहरी बिहार, वाहन चालविण्याचा वैध परवाना नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निखिल विजय देशमुख (२४, रा. फराडा), विनोद देशमुख (४५,रा.फराडा) आणि संतोष किनेकर,चाकलपेठ हे दुचाकीने प्रवास करीत असताना आष्टी कॉर्नर येथील हनुमान मंदिराजवळ समोरून येणाऱ्या जेसीबीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले.

स्थानिक नागरिक व पोलिसांच्या मदतीने जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. निखिल देशमुख यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. उर्वरित दोघांवर उपचार सुरू असून एकाचा गडचिरोलीच्या जिल्हा रुग्णालयात तर एकाचा चामोर्शीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते.
प्राथमिक तपासात संबंधित जेसीबी चालकाकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध मोटार वाहन कायद्यासह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळळ व्यक्त होत आहे.पुढील तपास चामोर्शी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दीपक डोंब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खोब्रागडे करीत आहेत.

