
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
कोरची तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता, दर्जेदार व प्रभावी शिक्षणाचा अभाव तसेच मूलभूत सोई-सुविधांची अपुरी उपलब्धता या गंभीर प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजप शिष्टमंडळाने जिल्हा परिषद गडचिरोलीचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतली. यावेळी सखोल चर्चा करून समस्यांचे तात्काळ निराकरण करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
शिष्टमंडळाने सांगितले की, अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच शाळांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा, शैक्षणिक साहित्य व विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सोयींचा अभाव जाणवत आहे. परिणामी ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर परिणाम होत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली.

या सर्व बाबींची दखल घेऊन त्वरित शिक्षक भरती, सुविधा उपलब्ध करून देणे व शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
यावेळी कोरची तालुक्यातील भाजपचे शिष्टमंडळ उपस्थित होते. यात मा. डॉ. नामदेव उसेंडी (माजी आमदार, गडचिरोली), मा. नारदजी फुलारे (सचिव, इलाख ग्रामसभा कोटगुल), मा. मुकेशदादा नरोटे (सचिव, भाजप आदिवासी आघाडी गडचिरोली), मा. अमित टेम्भूणे (सचिव, ग्रामसभा कोसमी नं. २), तसेच संजय पुडो, बंशी हलामी, दुलार सिंह नैताम, कुमार सोरी आदींचा समावेश होता.
दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

