
श्री. अरुण बारसागडे , उपसंपादक, न्यूज जागर चंद्रपूर
बल्लारपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जुनोना गावात घडलेली एक घटना समाजासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. मद्याच्या आहारी गेलेल्या एका महिलेने सार्वजनिक रस्त्यावर असभ्य वर्तन करून परिसरातील नागरिकांमध्ये भीती व अस्वस्थतेचे वातावरण निर्माण केले. या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी संबंधित महिलेविरुद्ध महाराष्ट्र मद्यनिषेध कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
२२ जून रोजी पोलीस कंट्रोल रूमला एका महिलेने मद्यप्राशन करून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत असल्याची माहिती मिळाली. तत्काळ डायल ११२ पथक घटनास्थळी दाखल झाले. तेथे ४४ वर्षीय महिला मद्यधुंद अवस्थेत भररस्त्यावर गैरवर्तन करत असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी तिला समजावून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र ती नशेच्या प्रभावाखाली असल्याने कोणत्याही सूचनांचे पालन करण्यास असमर्थ होती. अखेर पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तिला ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीत ती मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिच्याविरुद्ध महाराष्ट्र मद्यनिषेध कायद्याच्या कलम ८५(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
ही घटना केवळ कायदेशीर कारवाईपुरती मर्यादित नसून समाजासाठी एक गंभीर इशारा आहे. मद्यपानाचे वाढते व्यसन केवळ व्यक्तीचे आरोग्यच बिघडवत नाही, तर कुटुंब, समाज आणि सार्वजनिक सुव्यवस्थेवरही विपरीत परिणाम घडवते. अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते.
व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी प्रत्येकाने जागरूक राहणे, कुटुंबीयांनी वेळेवर समुपदेशन करणे आणि समाजानेही सकारात्मक हस्तक्षेप करणे आवश्यक असल्याचे मत सामाजिक क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत गैरवर्तन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

