
नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी न्यूज जागर
गडचिरोली,दि.१८ जून:गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘समर इंटर्नशिप प्रोग्राम २०२६’ अंतर्गत दिनांक १८ जून २०२६ रोजी गोंडवाना विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने, विद्यापीठ आणि जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन व मार्गदर्शन गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण आणि वित्त व लेखा अधिकारी सी.ए. भास्कर पाठारे प्रामुख्याने उपस्थित होते.

विद्यापीठ कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
धावपळीच्या जीवनशैलीत कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात विद्यापीठातील सर्व विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक ते वैद्यकीय मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग
या शिबिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘समर इंटर्नशिप प्रोग्राम २०२६’ मध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक च्या विद्यार्थ्यांनी या संपूर्ण उपक्रमात हिरीरीने भाग घेतला. शिबिराच्या नियोजनात आणि व्यवस्थापनात या विद्यार्थ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे त्यांना प्रत्यक्ष कामाचा आणि सामाजिक सेवेचा अनुभव घेता आला.
या यशस्वी उपक्रमाबद्दल विद्यापीठ प्रशासनाने जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथील वैद्यकीय चमूचे आणि उपस्थित सर्व घटकांचे आभार मानले आहेत. या शिबिरामुळे विद्यापीठ परिसरात आरोग्याविषयी जागरूकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

