डॉ. मंगेश बेकारसे (DR.MANGESH BEKARSE)

न्यूज जागर, महाराष्ट्र
सध्या समाज माध्यमातून बहुजन समाजातील महापुरूषांची बदनामी करण्याचे तसेच त्यांच्याप्रती आक्षेपार्ह पोस्ट करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून असाच प्रकार पारनेर तालुक्यातील भाळवणी येथून समोर आला. येथील एका डॉक्टरने विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजन नायक कांशीरामजी यांच्याबद्दल अपमानकारक व आक्षेपार्ह पोस्ट केली. यामुळे संतापलेल्या बहुजन समाजातील महिला आणि पुरूषांनी डॉक्टरच्या तोंडाला काळे फासून, चपलांचा हार घालत चोप दिला.
मिळालेल्या माहितीनुसार, पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील डॉ. मंगेश बेकारसे (DR.MANGESH BEKARSE) याने आपल्या सोशल मीडिया खात्यावरून महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजन नायक कांशीरामजी यांच्याबद्दल अपमानकारक व आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये संपूर्ण तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली.
या विकृत कृत्याचा जाब विचारण्यासाठी आणि आपला निषेध नोंदवण्यासाठी शुक्रवारी मोठ्या संख्येने बहुजन चळवळीतील कार्यकर्ते भाळवणी येथे एकत्र आले. संतप्त कार्यकर्त्यांनी डॉ. मंगेश बेकारसे याला गाठून थेट जाब विचारला. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या संतापाचा उद्रेक होऊन त्यांनी डॉ. बेकारसे याच्या तोंडावर शाई फेकली आणि गळ्यात चपलांचा हार घालून त्याचा जाहीर निषेध करत चांगलाच चोप दिला.
या घटनेमुळे पारनेर तालुक्यात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले असून डॉ. मंगेश बेकारसे याच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनात महिलांचा व युवकांचा सहभाग लक्षणीय होता. आंदोलकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा हातात घेत निषेध नोंदवला.
वंचित बहुजन आघाडीच्या पुढाकाराने डॉक्टराविरुद्ध गुन्हा दाखल झालेला असून त्याचे डॉक्टरची वैद्यकीय व्यवसायाची परवानगी रद्द करण्यासाठीही प्रयत्न केले जाणार असल्याचे बोलले जात आहे.
या घटनेनंतर भाळवणी आणि पारनेर परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलिस तैनात करण्यात आले असून फिक्स पॉइंटची संख्या वाढवण्यात आली आहे. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष सूचना दिल्या असून समाजकंटकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याचा निर्णय पारनेर पोलिसांनी घेतला आहे.
#डॉ. मंगेश बेकारसे #DR.MANGESH BEKARSE

