
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या वतीने आयोजित गोंडवाना इंटर-युनिव्हर्सिटी तिरंदाजी स्पर्धेत लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इंडियन राउंड प्रकारात प्रभावी कामगिरी करणाऱ्या अकादमीच्या तीन तिरंदाजांनी ऑक्टोबर २०२६ मध्ये आसाम येथे होणाऱ्या ऑल इंडिया इंटर-युनिव्हर्सिटी तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. या यशामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्पर्धेत लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीच्या खेळाडूंनी अचूक लक्ष्यभेद, एकाग्रता, तांत्रिक कौशल्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आपली गुणवत्ता सिद्ध केली. पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांत पदके मिळवत खेळाडूंनी अकादमीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
निखिल भोयर आणि दिया बॅनर्जी यांची सुवर्णभरारी

इंडियन राउंड पुरुष गटात निखिल भोयर याने प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरले. त्याच गटात आदित्य नाईगमकर याने तृतीय क्रमांक पटकावत कांस्यपदक मिळवले. महिला गटात दिया बॅनर्जी हिने उत्कृष्ट तिरंदाजीचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक जिंकले.
खेळाडूंनी मिळवलेल्या या यशामुळे लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीच्या प्रशिक्षणाची गुणवत्ता आणि उदयोन्मुख खेळाडूंना घडविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे.
व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्याकडून अभिनंदन
या यशाबद्दल लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी खेळाडूंचे आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.
ते म्हणाले, “गोंडवाना इंटर-युनिव्हर्सिटी तिरंदाजी स्पर्धेत लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीच्या खेळाडूंनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचा आम्हाला मनापासून अभिमान आहे. निखिल भोयर, दिया बॅनर्जी आणि आदित्य नाईगमकर यांनी मिळवलेले यश हे त्यांच्या जिद्द, शिस्त आणि समर्पणाचे प्रतीक आहे. यामध्ये प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि मेहनत यांचाही महत्त्वाचा वाटा आहे.
तळागाळातील क्रीडा प्रतिभेला प्रोत्साहन देणे, स्थानिक युवकांना प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना उच्चस्तरीय स्पर्धांसाठी सक्षम व्यासपीठ मिळवून देणे, यासाठी लॉयड्स कटिबद्ध आहे. ऑल इंडिया इंटर-युनिव्हर्सिटी तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या संपूर्ण संघाचे मी अभिनंदन करतो. राष्ट्रीय स्तरावरही हे खेळाडू उल्लेखनीय कामगिरी करतील, असा विश्वास आहे.”
क्रीडा प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी लॉयड्सचे योगदान
लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीला लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड आणि लॉयड्स इनफिनिट फाउंडेशन (LIF) यांचे पाठबळ लाभले आहे. ग्रामीण आणि स्थानिक भागांतील उदयोन्मुख खेळाडूंना प्रशिक्षण, प्रोत्साहन आणि स्पर्धांमध्ये कौशल्य सिद्ध करण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यावर या संस्थांचा भर आहे.
क्रीडा क्षेत्रातील नव्या प्रतिभांना योग्य मार्गदर्शन मिळावे, त्यांच्यातील कौशल्य विकसित व्हावे आणि त्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करावे, या उद्देशाने अकादमी सातत्याने प्रयत्नशील आहे.
गोंडवाना विद्यापीठाच्या स्पर्धेतील यशानंतर आता निखिल भोयर, दिया बॅनर्जी आणि आदित्य नाईगमकर हे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी सज्ज होत आहेत. त्यांच्या या यशामुळे गडचिरोलीच्या क्रीडा क्षेत्राला नवी ऊर्जा मिळाली असून, आगामी स्पर्धेतही हे तिरंदाज दमदार कामगिरी करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

