
नितेश गट्टीवार गडचिरोली/मुंबई दि.२७ मे :
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत कार्यरत राहून सेवा निवृत्त झालेल्या आदिवासी विभागातील कर्मचाऱ्यांना प्रलंबित असलेला आदिवासी प्रोत्साहन भत्ता तात्काळ मंजूर करण्यात यावा, अशी मागणी माजी आमदार तथा भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात मुंबई येथील मंत्रालयात मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांना माजी आमदार डॉ. होळी यांनी निवेदन सादर केले. निवेदनामध्ये एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत अनेक कर्मचारी सेवा निवृत्त झाले असून त्यांना शासन नियमानुसार मिळणारा आदिवासी प्रोत्साहन भत्ता अद्यापही मिळालेला नाही. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

माजी आमदार डॉ. होळी यांनी शासनाच्या संबंधित विभागाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन सर्व पात्र सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता मंजूर करावा, अशी मागणी केली. आदिवासी भागात दीर्घकाळ सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्काचा प्रश्न शासनाने प्राधान्याने सोडवावा, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी आदिवासी विभागातील विविध प्रलंबित प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली असून आदिवासी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी व्यक्त केली.

