
नितेश गट्टीवार दि.२१ मे गडचिरोली :
गडचिरोली चंद्रपूर मार्गावरील मुरखडा येथून काही अंतरावर आज सकाळी एक भीषण अपघात घडला. गडचिरोली वरून उमरखेडच्या दिशेने जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा हा अपघात झाला असून या दुर्घटनेत २५ ते ३० प्रवासी जखमी झाले असून दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गडचिरोली आगाराची बस प्रवाशांना घेऊन उमरखेड कडे जात होती बस मुरखडा गावाजवडील वळणावर आली असता बस समोर दुचाकी वाहन अचानक आल्याने दुचाकी वाहनाला वाचवण्याच्या नादात बस ड्रायव्हर चे बस वरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला लावलेले कठडे तोडून पलटी झाली. सदर बस अपघात इतका भीषण होता की बसने २/३ पलटी मारल्या प्रत्यदर्शीने सांगितले.

या अपघातात बसचा समोरील भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. अपघात होताच बसमध्ये एकच खडबड उडाली आणि प्रवाशांनी मदतीसाठी टाहो फोडला. अपघातात होताच बस मधील प्रवाश्यानी मदतीसाठी एकच टाहो फोडला. बस प्रवाश्यांचा मोठा आवाज ऐकून मुरखडा येथील स्थानिक नागरिक आणि तरुण तातडीने घटनास्थळाकडे धावले. गावकऱ्यांनी प्रसंगावधान राखत बसच्या खिडक्या आणि दरवाजे तोडून आत अडकलेल्या जखमी प्रवाशांना बाहेर काढले.
या घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. सर्व २५ ते ३० जखमी प्रवाशांना तात्काळ उपचारासाठी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. २५ ते ३० जखमी रुग्णांपैकी दोन रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर वैद्यकीय पथकाकडून युद्ध पातळीवर उपचार सुरू आहे. हा अपघात बसच्या समोर दुचाकी अचानक आल्याने घडला असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र गडचिरोली पोलिसांनी रस्ता मोकळा केला आहे.

