
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
4 वर्षांत खत निर्मिती शून्य, ओला-सुका कचरा वर्गीकरणच नाही; नागरिकांची चौकशीची मागणी, मुख्याधिकारी गड्डम यांनी नालीसफाई सुरू केली
कोरची, कोरची नगरपंचायत हद्दीत गेल्या चार वर्षांपासून घनकचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली एक कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीचा दुरुपयोग झाल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. स्वच्छतेच्या नावाने केवळ ‘मलिदा’ खाण्याचे काम ठेकेदारांनी केल्याने शहरात संताप व्यक्त होत आहे.

खत निर्मिती, वर्गीकरण कागदावरच
घनकचरा व्यवस्थापन नियमानुसार ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करून त्यापासून खत निर्मिती करणे व नगरपंचायतीचे उत्पन्न वाढवणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात गेल्या चार वर्षांत या संदर्भात कोणतीही प्रक्रिया राबवण्यात आलेली नाही. ओला-सुका कचरा वर्गीकरण, कंपोस्टिंग, उत्पन्न वाढीसाठीचे प्रकल्प सर्व कागदावरच राहिले.
ठेकेदाराच्या नावाने नगरसेवकांचा मलिदा?
नागरिकांचा आरोप आहे की, घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी ठेकेदाराच्या नावाने घेऊन प्रत्यक्षात स्थानिक नगरसेवकांनीच संपूर्ण यंत्रणा ताब्यात घेतली. ठेकेदाराच्या नावाखाली नगरसेवक ‘गब्बर’ झाल्याची चर्चा शहरात आहे. चार वर्षांत 1 कोटीपेक्षा जास्त निधी खर्च होऊनही शहरातील घनकचऱ्याची समस्या कायम आहे.
नवीन मुख्याधिकाऱ्यांमुळे आशा पल्लवित
प्रभारी मुख्याधिकारी तथा तहसीलदार प्रशांत गड्डम यांनी जानेवारी 2026 मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर चित्र बदलले आहे. त्यांनी संपूर्ण शहरातील नालीसफाईची मोहीम जोरात सुरू केली आहे. त्यामुळे यावर्षी पावसाळ्यात पाण्याचा निचरा चांगल्या पद्धतीने होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
चौकशीची मागणी जोरात
मात्र, केवळ नालीसफाई करून भागणार नाही. गेल्या चार वर्षांत घनकचरा व्यवस्थापनात झालेल्या 1 कोटीच्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी, दोषी ठेकेदाराला तात्काळ ब्लॅकलिस्ट करावे आणि संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी, अशी जोरदार मागणी गावकऱ्यांनी केली आहे. मुख्याधिकारी गड्डम यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी अपेक्षा आहे.

