
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
जिल्हाधिकाऱ्यांचे मुख्याधिकाऱ्यांना 7 दिवसात कारवाईचे आदेश; कलम 16 व 44 नुसार सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता
कोरची
कोरची नगर पंचायतीचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नगरसेवक मनोज प्यारेलाल अग्रवाल यांनी आपल्या सख्ख्या भावजयीच्या नावाने नगर पंचायतीचे कंत्राट घेतल्याची तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली यांनी 13 मे 2026 रोजी मुख्याधिकारी, नगर पंचायत कोरची यांना 7 दिवसांत नियमानुसार कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
शिक्षक कॉलनी, कोरची येथील शालीकराम सावजी कराडे यांनी 29 एप्रिल 2026 रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली. तक्रारीनुसार, नगरसेवक मनोज अग्रवाल यांचे सख्खे भाऊ आशिष प्यारेलाल अग्रवाल व त्यांची पत्नी वर्षा आशिष अग्रवाल यांच्या नावाने नगर पंचायतीचे काम घेण्यात आले आहे.

विशेष अनुदान योजना 2024-25 अंतर्गत वार्ड क्र. 04 मध्ये मधुकर नखाते यांच्या घरापासून प्रभाकर कराडे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकामाचे कंत्राट वर्षा आशिष अग्रवाल यांना देण्यात आले. या कामाची प्रशासकीय मान्यता किंमत 8,20,090 रुपये इतकी आहे.
महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 च्या कलम 16 (1)(i) व कलम 44 (1)(e) नुसार, कोणत्याही नगरसेवकाला स्वतःच्या किंवा त्याच्या नातेवाईकाच्या हितसंबंधातील कामाचे कंत्राट घेता येत नाही. असे केल्यास संबंधित नगरसेवकास सदस्य म्हणून राहण्यास अनर्ह ठरवण्याची तरतूद आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सामान्य प्रशासन विभागाने 13 मे 2026 रोजी पत्र काढून मुख्याधिकारी, न.पं. कोरची यांना निर्देश दिले आहेत. सदर तक्रार अर्जाची सखोल छाननी करून नियमानुसार 7 दिवसांत आवश्यक ती कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा, असे पत्रात नमूद आहे.
आता मुख्याधिकारी तथा तहसीलदार प्रशांत गड्डम यांच्यावर कारवाईची जबाबदारी आहे. 7 दिवसांची मुदत 20 मे 2026 रोजी संपत असल्याने नगर पंचायत प्रशासन काय भूमिका घेते याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

