
नितेश गट्टीवार न्यूज जागर गडचिरोली,दि.१८ मे:
गडचिरोली शहरात एका एटीएम मशीनने नाकारलेल्या शंभराच्या नोटांमुळे एका मोठ्या आंतरजिल्हा बनावट नोटांच्या रॅकेटचा धक्कादायक पर्दाफाश झाला आहे. गडचिरोली पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत थेट नागपूर येथील एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या बनावट नोटांच्या मिनी प्रिंटिंग प्रेसवर धाड टाकली. या कारवाईत दोन उच्चशिक्षित सख्ख्या भावांसह एकूण चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
एटीएम मशीनमुळे फुटला भांडाफोड

मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली शहरातील एका एटीएम मशीनमध्ये काही व्यक्ती पैसे जमा करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, मशीनने शंभराच्या काही नोटा बनावट असल्यामुळे त्या स्वीकारण्यास नकार दिला (रिजेक्ट केल्या). हा प्रकार लक्षात येताच बँक प्रशासनाने तातडीने गडचिरोली पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात या नोटा नागपूर येथील एका केंद्रातून छपाई करून आणल्याची माहिती समोर आली.
नागपुरातील हायटेक छपाई केंद्रावर पोलिसांची धाड
माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी नागपुरातील संबंधित फ्लॅटवर छापा टाकला. या छाप्यात पोलिसांना ५०, १०० आणि २०० रुपयांच्या बनावट नोटा, हायटेक कलर प्रिंटर, बॉण्ड पेपर, नोटा कापण्याचे कटिंग साहित्य आणि इतर अत्याधुनिक उपकरणे आढळून आली, जी पोलिसांनी जप्त केली आहेत. आरोपींनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हुबेहूब नोटांची नक्कल तयार केली होती.
उच्चशिक्षित सख्खे भाऊ मास्टरमाइंड
या रॅकेटमध्ये धक्कादायक बाब म्हणजे, एक जण सिव्हिल इंजिनिअर (Civil Engineer) असून दुसरा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे (Mechanical Engineering) शिक्षण घेत आहे. हे दोघे बंधू गेल्या ४ वर्षांपासून बनावट नोटा छापून बाजारात चालवत असल्याचा पोलिसांना संशय आहे.
पुढील तपास आणि पोलीस कोठडीगडचिरोलीचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना न्यायालयाने ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींनी आतापर्यंत बाजारात किती बनावट नोटा फिरवल्या आहेत आणि या रॅकेटमध्ये आणखी किती मोठ्या लोकांचा हात आहे, याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

