
नितेश गट्टीवार गडचिरोली/चामोर्शी दि.१४ एप्रिल:
गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेले आणि प्रस्तावित खाण प्रकल्प आता केवळ विकासाचा मुद्दा राहिलेला नाही. तर तो थेट आदिवासी आणि स्थानिक जनतेच्या अस्तित्वावर घाला घालणारा गंभीर प्रश्न बनला आहे. हजारो एकर हिरवीगार जंगलं आणि सुपीक जमीन खाणकामासाठी गिळंकृत केली जात असून, याचा सर्वात मोठा फटका येथील मूळ रहिवाशांना बसत आहे.
जंगल, जमीन आणि निसर्गाशी घट्ट नाळ जोडलेल्या आदिवासी समाजाला त्यांच्या पिढ्यानपिढ्यांच्या हक्काच्या भूमीवरून बेदखल केलं जात आहे. हा केवळ विस्थापनाचा प्रश्न नाही, तर त्यांच्या संस्कृती, परंपरा, ओळख आणि अस्मितेवर थेट आघात आहे.असे मत कांग्रेस सोशल मीडिया प्रमुख विजय लाड यांनी व्यक्त केले आहे.

विस्थापनामुळे हजारो कुटुंबं उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. रोजगार, शिक्षण, आरोग्य आणि जगण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा हिरावल्या जात आहेत. याहून गंभीर बाब म्हणजे, स्थानिक जनतेची स्पष्ट संमती न घेता हे प्रकल्प राबवले जात असल्याचे आरोप होत आहेत, ज्यामुळे लोकशाही प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
गडचिरोली–चामोर्शी परिसरातील औद्योगिक विकासाच्या नावाखाली एमआयडीसीमार्फत चामोर्शी तालुक्यातील सुमारे १४ गावांतील शेतजमिनी भूसंपादनासाठी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.या प्रक्रियेमुळे शेतकरी व स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि असंतोष निर्माण झाला आहे. शासनाने या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
काही लोकप्रतिनिधींनी या विषयावर आवाज उठवला असला, तरी स्थानिक स्तरावर अपेक्षित तीव्रता का दिसत नाही, असा सवाल जनतेतून उपस्थित होत आहे. शेतकरी आणि स्थानिक जनतेवर होणाऱ्या अन्यायाकडे दुर्लक्ष करणं आता परवडणारे नाही.
विकास” या नावाखाली जर आदिवासी आणि गरीब जनतेचंच आयुष्य उद्ध्वस्त केलं जात असेल, तर हा विकास नेमका कोणासाठी? हा जळजळीत प्रश्न आता प्रत्येक जागरूक नागरिकाच्या मनात घुमू लागला आहे.

