
गडचिरोली, दि. ४ एप्रिल :
गडचिरोली जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पुन्हा एकदा धडक कारवाई करत शासकीय कामासाठी लाच मागणाऱ्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडले आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी लाच मागितल्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली असून, प्रशासनातील भ्रष्टाचाराचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, ४८ वर्षीय तक्रारदाराने आपल्या मुलीच्या जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी ३१ मार्च २०२६ रोजी ऑनलाइन अर्ज सादर केला होता. त्यानंतर १ एप्रिल रोजी तो जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय, गडचिरोली येथे चौकशीसाठी गेला असता, तेथील प्रकल्प सहाय्यक (कंत्राटी) मंगेश मनोहर आंबोरकर (वय ४२, रा. शिवाजी नगर, रामपुरी वॉर्ड) यांनी प्रमाणपत्र काढून देण्यासाठी ५,००० रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले.

या मागणीमुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने २ एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार ACB पथकाने तत्काळ पडताळणी कारवाई केली. या पडताळणीदरम्यान कार्यालय सहाय्यक (कंत्राटी) दिनेश कवडू सिडाम (वय ३८, रा. बजरंग नगर, गडचिरोली) यांनी आंबोरकर यांच्या वतीने २,००० रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. पुढे चर्चेनंतर दोन्ही आरोपींनी १,००० रुपयांमध्ये व्यवहार करण्यास तयारी दर्शविली.
यानंतर ACBने सापळा रचून २ एप्रिल रोजीच संबंधित कार्यालयात कारवाई केली. या कारवाईत दोन्ही आरोपींना १,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. आरोपी मंगेश आंबोरकर यांच्या अंगझडतीत लाच रक्कम जप्त करण्यात आली आहे.
कारवाईदरम्यान आरोपींकडील मोबाईल फोनही जप्त करण्यात आले असून, आंबोरकर यांच्याकडून रेडमी १२ आणि सिडाम यांच्याकडून मोटो जी ४५ कंपनीचे मोबाईल ताब्यात घेण्यात आले आहेत. तसेच आरोपींच्या निवासस्थानी झडती घेण्याची प्रक्रिया सुरू असून, अधिक तपास सुरू आहे.
या प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अंतर्गत कलम ७ व १२ नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडली असून, पोलीस उपअधीक्षक विक्रांत सगणे यांनी पर्यवेक्षण केले. या मोहिमेत ACBच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

