
नितेश गट्टीवार ,गडचिरोली दि.३ एप्रिल:
परमपूज्य परमात्मा एक सेवक सेवाभावी संस्था, गडचिरोली यांच्या वतीने परमात्मा एक मानव मंदिर, शिवनेरी कॉलनी, खरपुंडी नाका येथे महान त्यागी बाबा जुमदेवजी यांची १०५ वी जयंती (जन्मोत्सव सोहळा) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमास महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे जिल्हाध्यक्ष, काँग्रेस कमिटी गडचिरोली यांनी उपस्थित राहून बाबा जुमदेवजी यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या महान कार्याचा गौरव करत मार्गदर्शनपर भाषण केले.

आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की, बाबा जुमदेवजी हे केवळ धार्मिक व्यक्तिमत्त्व नसून ते एक महान समाजसुधारक होते. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात मानवतेचा संदेश देत समाजात व्यापक जनजागृती केली. अंधश्रद्धा, अन्याय व सामाजिक विषमता याविरोधात त्यांनी सातत्याने लढा देत समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणले. त्यांच्या कार्यामुळे समाजातील अनेक घटकांना नवी दिशा मिळाली असून त्यांच्या विचारांची आजही तितकीच गरज आहे.
तसेच पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, बाबा जुमदेवजी यांच्या शिकवणीतून आपल्याला मानव धर्म, बंधुभाव, समता आणि सत्याचा मार्ग स्वीकारण्याची प्रेरणा मिळते. आजच्या आधुनिक युगात विज्ञान व तंत्रज्ञान प्रगत होत असतानाही समाजात अंधश्रद्धा अद्याप अस्तित्वात आहे. त्यामुळे प्रत्येकाने वैज्ञानिक दृष्टीकोन स्वीकारून अंधश्रद्धेचा त्याग करणे आवश्यक आहे.
याचबरोबर त्यांनी समाजातील व्यसनाधीनता, हुंडाबळी, स्त्री भ्रूणहत्या यांसारख्या गंभीर समस्यांवरही भाष्य केले.
त्यांनी सांगितले की, वाढत्या दारू, तंबाखू व इतर घातक व्यसनांमुळे युवकांचे भवितव्य धोक्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येकाने व्यसनांपासून दूर राहून स्वच्छ, निरोगी व सदाचारी जीवन जगणे गरजेचे आहे.तसेच हुंडाबळी व स्त्री भ्रूणहत्या यांसारख्या अमानुष प्रथांचा समाजातून संपूर्ण नायनाट करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन जनजागृती करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण साहेब, नगसेवक पराग पोररेडीवार, नगरसेविका सौं. मनीषा खेवले, नगरसेविका सौं. शिल्पा हेमके,डॉ. गोविंदराव डोनाळकर, दिवाकरजी ठेंगरे, अलोणे सर, विठ्ठलजी राऊत,हर्षल गेडाम, विजय बारापात्रे सह सेवक, महिला व युवक तसेच सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

