
नितेश गट्टीवार, गडचिरोली (चामोर्शी)दि.२६ मार्च:
चामोर्शी शहरातील विविध वॉर्डांमध्ये रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या उत्सवाच्या निमित्ताने माजी आमदार तथा भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी विविध ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमांना भेट दिली.
यावेळी माजी आमदार डॉ. होळी यांच्या हस्ते भगवान श्री राम यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. पूजनानंतर त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आणि प्रभू श्रीरामांच्या आदर्श जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.

ते पुढे म्हणाले की, प्रभू श्रीरामांनी सत्य, कर्तव्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा यांचे पालन करत समाजासाठी आदर्श निर्माण केला. त्यांच्या जीवनातील मूल्ये आजच्या काळातही तितकीच महत्त्वाची असून युवकांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमांना स्थानिक नागरिक, युवक, महिला तसेच विविध मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. रामनामाच्या जयघोषाने आणि भजन-कीर्तनांनी वातावरण भारावून गेले होते.
यावेळी माजी आमदार तथा भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांच्या सोबत रमेशजी बारसागडे जिल्हाध्यक्ष भाजपा गडचिरोली, जयश्री ताई वायलालवार नगराध्यक्ष चामोर्शी, भाजपा तालुका अध्यक्ष व न.पं.महीला समाज कल्याण सभापती रोशनी वरघंटे, कविता किरमे, किशोर ओलालवार, दिलीप चलाख, सुरेश रामानुजामवार, साईनाथ बुरांडे, जयराम चलाख, नीरज रामानुजामवार, रेवनाथ कुसराम, विनोद गौरकार आदी उपस्थित होते.
रामनवमी उत्सवामुळे चामोर्शी शहरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

