
नितेश गट्टीवार गडचिरोली:दि.१७ मार्च
स्वातंत्र्याची ७९ वर्षे उलटली तरी ज्या भागातील नागरिकांनी कधी गावात एसटी बस बघितली नव्हती, अशा अतिदुर्गम तुमरकोठी परिसरात आज दि.१७ मार्च आनंदाची लाट उसळली.गडचिरोली पोलीस दलाच्या अथक प्रयत्नांतून आणि राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्याने तुमरकोठी ते अहेरी या मार्गावर प्रथमच बससेवा सुरू करण्यात आली आहे.
आपल्या गावात पहिली बस दाखल होताच ग्रामस्थांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि नृत्याच्या तालावर ‘लालपरी’चे जंगी स्वागत केले.

नक्षलवादग्रस्त आणि भौगोलिकदृष्ट्या दुर्गम असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील तुमरकोठी, तोयनार, मुरुमभुशी यांसारख्या गावांना आता मुख्य प्रवाहाशी जोडले गेले आहे. भामरागडपासून ३० किमी आणि अहेरीपासून १०० किमी अंतरावर असलेल्या या गावांतील नागरिकांना आजवर पायपीट करण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र, पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली आज या स्वप्नवत वाटणाऱ्या सुविधेचा शुभारंभ झाला.
तुमरकोठी पोस्टेचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गोरखनाथ सुरासे यांच्या हस्ते बसचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी हातात राष्ट्रध्वज घेऊन आणि गावकऱ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात बसचे पूजन केले. या ऐतिहासिक क्षणी कोठी ग्रामपंचायतीच्या सदस्या भाग्यश्री लेकामी, गावचे पाटील रामजी मट्टामी, चिन्ना मट्टामी यांच्यासह सुमारे ३०० नागरिक उपस्थित होते.
विकासाचा नवा मार्ग
तुमरकोठी-कोठी-भामरागड-अहेरी या नवीन मार्गामुळे या परिसरातील ४५० ते ५०० नागरिकांचे जीवन सुसह्य होणार आहे. विशेषतः विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आणि रुग्णांना उपचारासाठी आता तालुका किंवा जिल्हा मुख्यालयात जाणे सोपे होईल. दुर्गम भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावणे हे आमचे ध्येय आहे. पोलीस दलाच्या संरक्षणात जिल्ह्यात आतापर्यंत ४२४ किमीचे रस्ते आणि ६५ पुलांचे काम पूर्ण झाले असून, सुरक्षित दळणवळणामुळेच ही बससेवा शक्य झाली आहे, असे गडचिरोली पोलीस दलाकडून यावेळी सांगण्यात आले.
विकासाचा ‘पोलीस पॅटर्न’
गेल्या वर्षभरात गडचिरोली पोलीस दलाने केवळ सुरक्षाच नव्हे तर पायाभूत सुविधांवरही भर दिला आहे. गट्टा-गर्देवाडा, कटेझरी-गडचिरोली आणि मरकणार-अहेरी यांसारख्या मार्गांवरही नुकतीच बससेवा सुरू करण्यात आली आहे. नक्षलवादी हालचालींना लगाम लावत जिल्हाभरात ५५९ मोबाईल टॉवर्स उभारून दळणवळणाचे जाळे भक्कम करण्यात आले आहे. या मोहिमेसाठी अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश (अभियान), कार्तिक मधीरा (अहेरी), गोकुल राज जी. (प्रशासन) तसेच सीआरपीएफच्या १९१ बटालियनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

