
नितेश गट्टीवार गडचिरोली(चामोर्शी)दि.१६ मार्च
पेसा क्षेत्रात कार्यरत पात्रता धारक कंत्राटी शिक्षकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन पुकारले असून या आंदोलनाला अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महासचिव उमेश उईके यांनी भेट देत पाठिंबा दर्शविला. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्या शिक्षकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना उमेश उईके यांनी सांगितले की, पेसा क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या पात्रता धारक कंत्राटी शिक्षकांवर अन्याय होत असून त्यांच्या न्याय्य मागण्या शासनाने तातडीने मान्य करणे गरजेचे आहे. त्यांनी शिक्षकांच्या आंदोलनाला नैतिक पाठिंबा देत शासनाने सकारात्मक भूमिका घेण्याचे आवाहन केले.

आंदोलनकर्त्या शिक्षकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये पात्रता धारक कंत्राटी शिक्षकांना ५० टक्के जागांवर खुल्या प्रवर्गातून कायमस्वरूपी सेवेत सामावून घेणे व उर्वरित जागा पवित्र पोर्टलमार्फत भरणे, तसेच कार्यरत शिक्षकांचे मानधन वेळेवर देण्यात यावे, यांचा समावेश आहे.
या मागण्यांसाठी शिक्षकांनी आंदोलन सुरू केले असून शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.

