
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी , गडचिरोली
सुरजागडच्या कच्च्या मालाने रस्ते उखडले; धुळीच्या साम्राज्यामुळे नागरिक हैराण, अपघातांचे सत्र सुरूच!
कोरची

गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तर-पूर्व सीमेवर वसलेला आणि छत्तीसगड राज्याला जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेला ‘कोरची’ तालुका सध्या विकासकामांच्या नावाने ‘वनवासात’ असल्याचे चित्र दिसत आहे. जिल्हा मुख्यालयापासून १२० किमी अंतरावर असलेल्या या नगरपंचायत क्षेत्रात सध्या धुळीचे लोट आणि खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, प्रशासकीय दिरंगाईमुळे सामान्य जनतेचे आरोग्य आणि जीव धोक्यात आला आहे.
अवजड वाहनांचा विळखा आणि रस्त्याची दैना
छत्तीसगड राज्याला जोडणाऱ्या या राज्य मार्गावरून दररोज सुरजागड लोह प्रकल्पातील कच्चा माल वाहून नेणारी हजारो अवजड वाहने धावतात. या अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. कोरची नगरपंचायतीच्या अगदी जवळून जाणाऱ्या या मुख्य रस्त्याच्या दुरावस्थेमुळे संपूर्ण परिसरात धुळीचे लोट पसरत आहेत. रस्ता दुरुस्तीचे काम ‘कासवगतीने’ सुरू असल्याने नागरिकांच्या संतापाचा बांध आता फुटू लागला आहे.

आरोग्य आणि शिक्षण केंद्रांना धुळीचा विळखा
ज्या मार्गावर ही भीषण परिस्थिती आहे, त्याच परिसरात तहसील कार्यालय, पंचायत समिती आणि सरकारी दवाखाना यांसारखी महत्त्वाची शासकीय कार्यालये आहेत. विशेष म्हणजे, याच भागात आश्रमशाळा, एकलव्य रेसिडेन्शिअल स्कूल, वनश्री महाविद्यालय, आय.टी.आय., आणि वसतिगृह आहेत. हजारो विद्यार्थी आणि रुग्णांना याच विषारी धुळीचा सामना करावा लागत आहे. धुळीमुळे श्वसनाचे विकार बळावत असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
बायपास की ‘डेथ ट्रॅप’?
गेल्या अनेक वर्षांपासून या बायपास रस्त्याची दयनीय अवस्था आहे. नगरपंचायत अंतर्गत सुरू असलेली संथ कामे आणि रखडलेला बायपास यामुळे नागरिक त्रस्त आहेत. या खराब रस्त्यामुळे आतापर्यंत अनेक छोटे-मोठे अपघात झाले असून काहींना नाहक आपला जीवही गमवावा लागला आहे. तरीही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे डोळेझाक का करत आहेत? असा सवाल संतप्त नागरिक विचारत आहेत.

स्थानिकांचा इशारा
“रोज हजारो ट्रक धुळ उडवत जातात, घरात राहणे मुश्किल झाले आहे. सरकारी कामासाठी दवाखान्यात जाताना धूळ खात जावे लागते. जर लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही, तर आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल.”
स्थानिक नागरिक, कोरची.\
आता तरी जिल्हा प्रशासन आणि संबंधित बांधकाम विभाग या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करणार की, आणखी कोण्या निष्पाप जीवाचा बळी जाण्याची वाट पाहणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

