
प्रतिनिधी / रुपेश सलामे
गडचिरोली :
देशातील दहा प्रमुख कामगार संघटनांनी गुरुवार, दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी दिलेल्या भारत बंदच्या हाकेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने जाहीर व संपूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी च्या सुचणेनुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री. हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिली.
केंद्र सरकारने कामगार कायद्यांमध्ये केलेल्या बदलांमुळे देशातील कामगार वर्गासमोर गंभीर प्रश्न निर्माण झाले असून त्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा येत आहे, नव्या कायद्यांमुळे रोजगाराच्या संधी कमी होत असून कामगारांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. तसेच केंद्र सरकारची आर्थिक धोरणे ही कामगार व शेतकरीविरोधी आहे.
त्यामुळे विविध शेतकरी संघटनांनी भारत बंद ची हाक दिली असून कामगार–शेतकरी एकजुटीचे हे आंदोलन अधिक व्यापक व प्रभावी होणार असल्याचे चित्र आहे.

मा. प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते व लोकप्रतिनिधींनी गुरुवार, १२ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या भारत बंदमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून संपूर्ण पाठिंबा द्यावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले आहे.
कामगार व शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असून त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा निर्धार पक्षाने केला आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी भारत बंदमध्ये सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

