
जंगोरायताड महिला संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन
गडचिरोली : नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गडचिरोलीसाठी अधिकृतरीत्या निश्चित करण्यात आलेली 15 हेक्टर आर (37.6 एकर) जागा कृषी विज्ञान केंद्राकडे परत न करता त्याच ठिकाणी महाविद्यालयाचे बांधकाम सुरु करण्यात यावे, अशी मागणी जंगोरायताड महिला संघटना गडचिरोली यांनी केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सदर जागा ही जिल्हा रुग्णालयाच्या अगदी शेजारी तसेच शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्यामुळे रुग्णांना उपचार मिळविण्यास तसेच वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक शिक्षण घेण्यास मोठी सोय होईल. ग्रामीण व दुर्गम भागातून येणाऱ्या रुग्णांना जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय एकाच ठिकाणी असल्याने थेट फायदा होणार आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, जर ही जागा कृषी विज्ञान केंद्राकडे परत केली गेली तर महाविद्यालयाच्या बांधकाम प्रक्रियेत विलंब होईल. यामुळे गडचिरोली जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु होण्यास अडथळा निर्माण होईल आणि नागरिकांना आरोग्य सेवांचा लाभ वेळेत मिळू शकणार नाही.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी जनहिताचा विचार करून गडचिरोली येथील 37.6 एकर अधिकृत जागेवरच महाविद्यालयाचे बांधकाम सुरु करावे, अशी ठाम भूमिका मांडली आहे. यावेळी निवेदन देताना जंगोरायताड महिला संघटनेच्या अध्यक्षा आरती कोल्हे, आरती कंगाले, विद्या दुग्गा, तनुजा कुमरे, शामला घोडाम, स्मिता नैताम, वनिता ताराम, उमेश उईके, भोजराज काणेकर, मुनीश्वर बोरकर, प्रेमदास रामटेके, दशरथ साखरे, दामोधर शेंडे, मारोती भैसारे आदी उपस्थित होते.

