
गडचिरोली :- गडचिरोली येथील नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजूर झालेली जागा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विज्ञान केंद्रास देण्याबाबत हालचाली सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महिला शाखा, गडचिरोली तर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गडचिरोली हा आदिवासी बहुल व मागास जिल्हा असून येथे आरोग्य व शिक्षणाची अत्यंत नितांत गरज आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारल्यास स्थानिक विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची संधी मिळेल तसेच नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होतील. दुसरीकडे, कृषी विज्ञान केंद्र स्थापनेमुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व मार्गदर्शन मिळणार असल्याने दोन्ही प्रकल्प अत्यंत महत्वाचे आहेत.
मात्र, कोणत्या प्रकल्पास मंजूर जागा द्यायची हा निर्णय लोकांच्या सहभागाशिवाय घेणे अन्यायकारक ठरेल, असे परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे या प्रश्नावर जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ विचारवंत, ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसभा, स्वयंसेवी संस्था व नागरिक यांच्या प्रतिक्रिया व मते घेतल्यावरच अंतिम निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

निवेदनात आणखी नमूद करण्यात आले की, गडचिरोली जिल्हा निर्मितीसाठी बाबुराव मडावी यांनी केलेला संघर्ष ही जिल्ह्याची ऐतिहासिक परंपरा आहे. त्यामुळे जिल्ह्याशी निगडीत कोणताही महत्त्वाचा निर्णय लोकशाही पद्धतीने आणि पारदर्शकतेने घेण्यात यावा, हीच खरी बाबुराव मडावी यांना आदरांजली ठरेल.
या प्रसंगी महिला शाखेच्या जिल्हाध्यक्षा पुष्पलता कुमरे, आरती कोल्हे, आरती कंगाले, विद्या दुग्गा, रेखा तोडसे, स्मिता नैताम, रोहिणी मसराम, माधुरी पडोती, शारदा मडावी, तनुजा कुमरे, वामन जुनघरे, उमेश उईके, सुरज मडावी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होत्या.

