
६ सप्टेंबरपासून नवीन शाळांमध्ये हजर राहण्याचे निर्देश
अमरावती – शैक्षणिक सत्र २०२५-२६ करिता अमरावती जिल्हा परिषदेअंतर्गत ३१७ प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. संबंधित शिक्षक नवीन शाळांमध्ये ६ सप्टेंबर रोजी रुजू होतील, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे.
शासनाच्या बदल्या धोरणानुसार व प्राप्त निर्देशांच्या अधीन राहून ही बदली प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलद्वारे पार पडली आहे. विशेष संवर्ग शिक्षक भाग १ (४४), विशेष संवर्ग शिक्षक भाग २ (१५३), बदली अधिकार प्राप्त शिक्षक (८०), व बदलीपात्र शिक्षक (४०) अशा एकूण ३१७ शिक्षकांचा यात समावेश आहे.
संबंधित शिक्षकांचे संगणकीय आदेश गट शिक्षणाधिकारी कार्यालयांना ई-मेलद्वारे पाठविण्यात आले असून, तात्काळ अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले आहेत. चिखलदरा व धारणी तालुक्यांतील शाळांमध्ये शून्य शिक्षकसंख्या होणार नाही याची विशेष दक्षता घेण्यात येणार असून, पर्यायी व्यवस्था करूनच कार्यमुक्ती करण्याचे निर्देश गट शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.


