
मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
बुलढाणा – श्री क्षेत्र भीमाशंकर दर्शनासाठी देवढाबा (ता. मलकापूर, जि. बुलढाणा) येथून आलेल्या भाविकांच्या पिकअप गाडीचा ब्रेक फेल झाल्याने झालेल्या अपघातात १७ भाविक जखमी आहेत. बुधवारी (ता.
३) सकाळी ११ वाजता घोडेगाव ते भीमाशंकर रस्त्यावर पोखरी (ता. आंबेगाव) गावाजवळ अपघात झाला. जखमींवर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
ता. ३१ ऑगस्ट रोजी पिकप गाडीतून देवढाबा येथून २१ भाविक देवदर्शनासाठी निघाले होते. त्यांनी वणी, नाशिक, शिर्डी, शनिशिंगणापूर, जेजुरी व श्री क्षेत्र आळंदी यात्रा करून भाविक श्री क्षेत्र भीमाशंकरकडे जात होते.
धोकादायक वळणावर गाडीचा ब्रेक फेल होऊन चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी झाली. स्थानिक ग्रामस्थ व ये-जा करणाऱ्या भाविकांनी जखमींना मदत केली. त्यांना ताबोडतोब शासकीय रुग्णवाहिकांमधून मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

जखमींची नावे – पिकप चालक – प्रभाकर सुधाकर बोरसे (वय-२४), आविष गणेश कवळे (वय-१२), ज्योती गणेश कवळे (वय-३८), निर्मला भागवत बोरसे (वय-६०), ज्ञानेश्वर सपकाळ (वय-६५), सुनीता संदीप कवळे (वय-४०), कल्पना विजय कवळे (वय-४५), शोभा श्रावण बोरसे (वय-५५), सूर्यकांत डवले (वय-४५), शारदा भास्कर जांभे (वय-४०), मुक्ताबाई साबळे (वय-५५), उषा सूर्यकांत डवले (वय-४४), मंदाबाई सुपदा फदले (वय-५०) सूर्यकांत दगडू डवले (वय-४५), सुनिता संजय सपकाळ (वय-४७), शारदाबाई भास्कर जांबे (वय-५०) हे जखमी झाले. सुदैवाने चार भाविकांना कोणतीही दुखापत झाली नाही.
‘रस्त्याच्या वळणावर अचानक पणे ब्रेक फेल झाला. गाडी नियंत्रित करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. स्थानिक ग्रामस्थ व भाविकांनी मदत करून आधार दिला.’ असे पिकप चालक प्रभाकर बोरसे यांनी सांगितले.
मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवाजीराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जखमींवर डॉ. राहुल खेमणार, डॉ. विवेकानंद फसाले, डॉ. अश्विनी गोरे, डॉ. विनोद कानगुले यांच्यासह डॉक्टर व परिचारिकांनी उपचार केले. जखमींचे जेवण व नाश्ता व्यवस्था रूग्णालयामार्फत करण्यात आली आहे. सर्वांची प्रकृती व्यवस्थित असल्याचे डॉ.जाधव यांनी सांगितले.

