
अमरावती – अमरावती तहसील कार्यालय हे नागरिकांच्या कामकाजाचे प्रमुख केंद्र, पण गेल्या काही दिवसांपासून कार्यालय परिसर हा वाळूच्या जप्त गाड्यांनी गच्च भरून गेला आहे.
प्रशासनाने बेकायदेशीर वाळू उत्खननाविरुद्ध कारवाई करून जप्त केलेल्या ट्रक, ट्रॅक्टर व डंपर या थेट तहसील कार्यालयात आणून उभे केले आहेत. त्यामुळे कार्यालयात येणाऱ्या सामान्य नागरिकांना प्रचंड गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.
तहसील कार्यालय हे लोकांचे हक्काचे ठिकाण की जप्त गाड्यांचे गॅरेज? असा नागरिकांचा सवाल आहे. कार्यालयात दररोज शेकडो शेतकरी, महिला, वृद्ध, विद्यार्थी विविध कामांसाठी येतात. मात्र कार्यालय गेटपासून आतपर्यंत वाळूच्या गाड्यांची रांग लागल्याने पायवाट देखील अडवली गेली आहे. यामुळे वाहनांची वर्दळ, पायी जाणाऱ्यांची चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण होत आहे. याबाबत काही नागरिकांनी संताप व्यक्त केला. कारवाई करणे योग्य आहे, पण जप्त वाहने ठेवण्याकरिता स्वतंत्र मैदानी जागा अथवा पोलिस ठाण्याजवळील मैदानाचा वापर करायला हवा. तहसील कार्यालयाच्या अंगणात गाड्या लावल्यामुळे नागरिकांना प्रशासनाकडे कामे करण्यासाठी त्रास होतोय. महिला व वृद्धांना उभ्या गाड्यांमधून वाट काढून आत यावे लागते. अपघाताची शक्यता ही नाकारता येत नाही, असे नागरिकांनी स्पष्ट केले.तहसील प्रशासनाने या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन नागरिकांचा त्रास कमी करणे गरजेचे आहे. स्वतंत्र जागेचा पर्याय शोधून जप्त वाहनांची तात्पुरती व्यवस्था केल्याशिवाय या समस्येचे निराकरण होणार नाही. अन्यथा, कार्यालय की गॅरेज? हा सवाल अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.


