
१५ व १६ नोव्हेंबरऐवजी १४ व १५ नोव्हेंबर रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन; पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधणार संवाद; राज्यपाल, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

आदिवासी संस्कृती, परंपरा, कला आणि ऐतिहासिक वारशाचे घडणार भव्य दर्शन; माजी खासदार डॉ. अशोक नेते यांचे आदिवासी बांधवांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली |

दि. १३ नोव्हेंबर : क्रांतिसूर्य, महान जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आणि केंद्र शासनाच्या वतीने घोषित करण्यात आलेल्या ‘जनजाती गौरव दिवस’ निमित्त गडचिरोली येथे दि. १४ व १५ नोव्हेंबर रोजी दोन दिवसीय भव्य जनजाती गौरव दिवस सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा संकुल क्रीडा मैदान (स्टेडियम), गडचिरोली येथे होणाऱ्या या सोहळ्यात आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा, पारंपरिक नृत्य, गायन, वादन, लोककला आणि ऐतिहासिक वारशाचे दर्शन घडणार आहे. या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे दि. १५ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत.
या सोहळ्यास महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय आदिवासी कार्यमंत्री जुएल ओराम, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके तसेच खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मन्नालाल रावत यांच्यासह केंद्र व राज्यातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांचे गडचिरोलीत आगमन
जनजाती गौरव दिवस सोहळ्याच्या पूर्वतयारी आणि नियोजनाच्या अनुषंगाने राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांचे दि. १३ नोव्हेंबर रोजी गडचिरोली येथे आगमन झाले. यावेळी सर्किट हाऊस येथे माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
त्यानंतर सामाजिक सभागृह, गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दोन दिवसीय सोहळ्याची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे स्वरूप, सांस्कृतिक उपक्रम, विविध आयोजनांची रूपरेषा तसेच प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या तयारीचा आढावा यावेळी मांडण्यात आला.
१४ नोव्हेंबरला आदिवासी संस्कृती, नृत्य आणि कलांचे सादरीकरण
दि. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी आदिवासी समाजातील पारंपरिक देव-देवता, धार्मिक श्रद्धा आणि पूजा विधींचे दर्शन घडविण्यात येणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विविध आदिवासी समाजांच्या पारंपरिक नृत्य, गायन आणि वादन कलांचे सादरीकरण होणार आहे.
सायंकाळी ६ वाजता ‘वनगर्जना – स्टोरी ऑफ राणी दुर्गावती अँड बिरसा मुंडा’ या विशेष नाटिकेचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या नाटिकेतून राणी दुर्गावती आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या शौर्यपूर्ण जीवनकार्याचा प्रेरणादायी इतिहास उलगडणार आहे. याशिवाय पारंपरिक वेशभूषा, सांस्कृतिक झांक्या, लोककला आणि विविध नृत्याविष्कार हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण राहणार आहेत.
१५ नोव्हेंबरला मुख्य सोहळा; पंतप्रधान मोदी साधणार संवाद
दि. १५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती आणि जनजाती गौरव दिवस साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त त्यांच्या महान कार्याचे स्मरण करून अभिवादन करण्यात येणार आहे. याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधणार असल्याने या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्तरावर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
आदिवासी समाजाचा स्वाभिमान, अस्मिता, हक्क, संस्कृती आणि गौरवशाली इतिहासाचा जागर या सोहळ्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
भगवान बिरसा मुंडा यांचा संघर्ष नव्या पिढीसाठी प्रेरणादायी
भगवान बिरसा मुंडा यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध तसेच अन्याय, शोषण आणि अत्याचाराविरुद्ध दिलेला लढा भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण पर्व आहे. आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आणि जल, जंगल, जमीन यांच्या संरक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्ष आजही प्रेरणादायी आहे.
आदिवासी समाजात स्वाभिमान, संघटनशक्ती आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द निर्माण करणाऱ्या भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, तसेच आदिवासी समाजाच्या संस्कृती, परंपरा, लोककला आणि ऐतिहासिक वारशाचे जतन व संवर्धन करणे हा या सोहळ्यामागील प्रमुख उद्देश आहे.
डॉ. अशोक नेते यांचे आदिवासी समाज बांधवांना आवाहन
यावेळी माजी खासदार डॉ. अशोकजी नेते म्हणाले की, भगवान बिरसा मुंडा हे केवळ आदिवासी समाजाचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध आणि अन्याय, शोषणाविरुद्ध दिलेला लढा प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आयोजित जनजाती गौरव दिवस हा आदिवासी समाजाच्या एकजुटीचा, सांस्कृतिक अस्मितेचा आणि गौरवशाली परंपरेचा उत्सव आहे.
या सोहळ्याच्या माध्यमातून आपल्या समाजातील समृद्ध कला, संस्कृती, परंपरा आणि ऐतिहासिक वारसा देशासमोर मांडण्याची संधी मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या संवादामुळे या कार्यक्रमाला राष्ट्रीय महत्त्व प्राप्त होणार आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील सर्व आदिवासी समाज बांधव, महिला भगिनी, युवक-युवती आणि नागरिकांनी १४ व १५ नोव्हेंबर रोजी जिल्हा संकुल क्रीडा मैदान, गडचिरोली येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. नेते यांनी केले.
बिरसा मुंडा कला मंचाच्या कार्यक्रमस्थळाची पाहणी
दरम्यान, कार्यक्रमाच्या तयारीच्या अनुषंगाने बिरसा मुंडा कला मंचाच्या कार्यक्रमस्थळी मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी मंच व्यवस्था, सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन, आवश्यक सुविधा आणि प्रशासकीय तयारीचा आढावा घेण्यात आला.
याप्रसंगी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, माजी खासदार डॉ. अशोकजी नेते, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्यासह विविध पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेला भाजप जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी, नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, माजी आमदार कृष्णा गजबे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, कि.मो.प्र. सचिव रमेश भुरसे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, आदिवासी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन कोडवते, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रिंकू पापडकर, अनिल पोहनकर तसेच भाजपचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भगवान बिरसा मुंडा यांच्या क्रांतिकारी विचारांना अभिवादन करण्यासोबतच आदिवासी समाजाची एकजूट, सांस्कृतिक वैभव, अस्मिता आणि स्वाभिमानाचा गौरवशाली वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने गडचिरोलीत आयोजित करण्यात आलेला हा दोन दिवसीय जनजाती गौरव दिवस सोहळा विशेष ठरणार आहे. जिल्ह्यातील सर्व आदिवासी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्यात सहभागी व्हावे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन माजी खासदार डॉ. अशोक नेते यांनी केले आहे.

