
धान खरेदी केंद्र, रस्ते, पाणीपुरवठा, सिंचन आणि नियमित बससेवेचा प्रश्न ऐरणीवर; समस्यांच्या पाठपुराव्याचे आमदारांचे आश्वासन

नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली (आरमोरी), दि. १३ नोव्हेंबर : आरमोरी तालुक्यातील मानापूर येथील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी आमदार रामदास मसराम यांनी गुरुवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी गावातील नागरिक, शेतकरी व ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. गावाच्या विकासाशी संबंधित विविध प्रश्नांवर ग्रामस्थांनी आमदारांचे लक्ष वेधले.

या भेटीदरम्यान गावात धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी प्रामुख्याने करण्यात आली. तसेच गाव परिसरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, नळाद्वारे नियमित पाणीपुरवठा होत नसल्याची समस्या, शेतीसाठी पुरेशा सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आदी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या वीजपुरवठ्याच्या प्रश्नावरही ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली. शेतातील वीजपुरवठ्याचे लोडशेडिंग व वीजपुरवठ्याचे वेळापत्रक याबाबत शेतकऱ्यांना आगाऊ माहिती मिळावी, यासाठी संबंधित विभागाने योग्य व्यवस्था करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याशिवाय गावातील नागरिक, विद्यार्थी व नोकरदारांच्या सोयीसाठी नियमित बससेवा सुरू करण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली.
ग्रामस्थांनी मांडलेल्या प्रत्येक समस्येची आमदार रामदास मसराम यांनी गांभीर्याने दखल घेतली. गावाच्या मूलभूत सुविधा आणि विकासाशी निगडित प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
या प्रसंगी काँग्रेस कमिटी आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष दिलीप घोडाम, सामाजिक कार्यकर्ते धनपाल मिसार, भाईचंद गुनुले, माजी सरपंच माधुरी पेंदाम, दिगंबर रणदिवे, तुकाराम वैरकर, सागर वाढई, ऋषिकेश रामदास मसराम, नामदेव किरंगे, लीलाधर चौधरी, दुधराम कावळे, मुरारी टेंभुर्णे, जयराम हलामी, नरेश टेंभुर्णे, नामदेव सोनुले, नरहरी साखरे, नामदेवराव गुरूनुले, नेताजी नारनवरे, पुरुषोत्तम पेंदाम, नारायण मेश्राम, विनायक अहिरकार, प्रकाश लेंगुरे, देवनाथ मडावी, धुमकांत घोडमारे, दीपक रस्से, नारायण गुरूनुले, रमेश तुलावे, नामदेव वैरागडे, रामहरी चौधरी, पितांबर अहिरकर, हिराराम लाखनकर, मुकुंदा टेंभुर्णे, दादाजी एकने, गणेश मेश्राम, विकास मेश्राम, चेतन उईके, ईश्वर वालदे व सचिन मोरघडे यांच्यासह गावातील नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावातील मूलभूत प्रश्न मार्गी लागावेत आणि नागरिकांना आवश्यक सुविधा मिळाव्यात, अशी अपेक्षा यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.

