
चामोर्शीत भाजपच्या वतीने गरजू कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप; सामाजिक बांधिलकी जपत दिवाळीचा आनंद वंचितांच्या दारी

नितेश गट्टीवार
चामोर्शी, दि. ११ नोव्हेंबर :

दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि मांगल्याचा सण! मात्र समाजातील अनेक वंचित व गरजू कुटुंबांना आर्थिक परिस्थितीमुळे दिवाळीचा आनंद मनमुराद साजरा करता येत नाही. अशा कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने ‘एक दिवा वंचितांसाठी – पालावरची दिवाळी’ हा स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
महाराष्ट्र राज्याचे कर्तृत्ववान मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार, भारतीय जनता पार्टीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे यांच्या नेतृत्वात चामोर्शी येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी परिसरातील पाडा-वस्तीवर राहणाऱ्या वंचित व गरजू कुटुंबांना दिवाळीनिमित्त किराणा साहित्याचे वाटप करून त्यांच्या आनंदात सहभागी होण्यात आले.
दिवाळीचा सण प्रत्येकाच्या घरात आनंदाचा दीप उजळवणारा असावा, या भावनेतून भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबविला. केवळ दिव्यांची रोषणाई नव्हे, तर गरजूंच्या जीवनात आनंदाची ज्योत पेटविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भास्कर बुरे, किसान मोर्चाचे जिल्हा महामंत्री साईनाथ बुरांडे, आदिवासी मोर्चाचे जिल्हा महामंत्री रेवनाथ कुसराम, भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष भाविक आभारे, भाजपा युवा मोर्चाचे तालुका महामंत्री विनोद किरमे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वंचितांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारी आणि सामाजिक एकोपा जपणारी ‘पालावरची दिवाळी’ गरजू कुटुंबांसाठी आनंदाचा दीप ठरली. खऱ्या अर्थाने दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंदाची ज्योत पेटविण्यातच दिवाळीचे खरे सार्थक आहे, हा प्रेरणादायी संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

