
आ. डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते लोकार्पण व पूजन; ई-चार्जिंग स्टेशनचेही उद्घाटन

नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली,दि.१२ नोव्हेंबर : गडचिरोली जिल्ह्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिकतेची जोड मिळाली असून, गडचिरोली आगारात दाखल झालेल्या १५ अत्याधुनिक ‘शिवाई इलेक्ट्रिक’ बसेसचा लोकार्पण व पूजन सोहळा आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते गडचिरोली बसस्थानक येथे उत्साहात पार पडला. याचवेळी इलेक्ट्रिक बसेसच्या चार्जिंगसाठी उभारण्यात आलेल्या ई-चार्जिंग स्टेशनचेही उद्घाटन करण्यात आले. या नव्या सुविधेमुळे जिल्ह्याच्या परिवहन व्यवस्थेत महत्त्वपूर्ण भर पडली आहे.

मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या विकासाला गती मिळत असून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी परिवहन मंत्री ना. प्रतापराव सरनाईक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश मिळून गडचिरोली आगारासाठी १५ अत्याधुनिक इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध झाल्या आहेत.
या बसेस गडचिरोली-नागपूर, गडचिरोली-चंद्रपूर, गडचिरोली-अहेरी आणि गडचिरोली-मुरुमगाव या प्रमुख मार्गांवर धावणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांना आरामदायी, सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त प्रवासाचा लाभ मिळणार आहे. विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या या बसेस प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
इलेक्ट्रिक बसेसच्या नियमित व सुरळीत संचालनासाठी ई-चार्जिंग स्टेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पर्यावरणाचे संरक्षण, इंधन बचत आणि प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने इलेक्ट्रिक वाहतुकीचा स्वीकार ही काळाची गरज बनली आहे. त्या दिशेने गडचिरोली जिल्ह्याने आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.
या सुविधांमुळे गडचिरोली जिल्ह्याच्या दळणवळण व्यवस्थेला नवी गती मिळण्यासोबतच प्रवाशांच्या प्रवासाचा अनुभव अधिक सुखकर होणार आहे.
याप्रसंगी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्यासमवेत भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, भाजयुमोचे हरिश माकडे, शुभम बाळेकरमकर, यश कोंडावार, सतीश पेंडोरकर, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सनियंत्रण समिती क्रमांक ०३ चे प्रादेशिक व्यवस्थापक श्रीकांत गभने, प्रादेशिक अभियंता महेंद्रकुमार नेवारे, गडचिरोली विभागाचे विभाग नियंत्रक डॉ. चंद्रकांत वडस्कर, यंत्र अभियंता छगन डिवसे, विभागीय वाहतूक अधिकारी कन्हैयाजी भोगे तसेच गडचिरोली आगार व्यवस्थापक सचिनजी नेवारे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
१५ इलेक्ट्रिक बसेस आणि ई-चार्जिंग स्टेशनच्या सुविधेमुळे गडचिरोलीच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आधुनिक पर्वाची सुरुवात झाली असून, जिल्ह्यातील प्रवाशांसाठी हा महत्त्वपूर्ण दिलासा ठरणार आहे.

