
एटापल्ली : तालुक्यातील चोखेवाडा, कोईनदुळ, गडदापल्ली, रेकणार, गुमडी व येडंमपल्ली या दुर्गम आदिवासी गावांना जोडणारा सलग डांबरी रस्ता तसेच आवश्यक ठिकाणी पुलांचे बांधकाम तातडीने मंजूर करावे, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (CPI) जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदार, एटापल्ली यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. या गावांना कायमस्वरूपी रस्ता नसल्याने नागरिकांना आजही जंगलातील पायवाटांचा वापर करून ये-जा करावी लागत आहे. पावसाळ्यात नदी, नाले व ओढ्यांना पूर आल्याने गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे विद्यार्थी, रुग्ण, महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
“नागरिकांना अजून किती वर्षे या मूलभूत सुविधांसाठी प्रतीक्षा करावी लागणार? या दुर्गम गावांना विकास कधी मिळणार?” असा सवाल CPI ने उपस्थित केला आहे. रस्ते, पूल, आरोग्य, शिक्षण आणि इतर मूलभूत सुविधांपासून नागरिक वंचित असताना विकासाचा लाभ सर्व भागांपर्यंत समानपणे पोहोचणे आवश्यक असल्याचे पक्षाने म्हटले आहे.

“गडचिरोलीच्या दुर्गम भागात खनिज संपत्तीच्या विकासाच्या चर्चा होतात; मात्र ज्या गावांमध्ये खाणकाम नाही, त्या गावांच्या मूलभूत सुविधांकडेही शासनाने तितक्याच गांभीर्याने लक्ष द्यावे. विकास केवळ खाणींपुरता मर्यादित राहणार का? ज्या भागात खाण नाही, तिथे सरकारचे लक्ष कधी जाणार?” असा प्रश्न CPI चे जिल्हा सहसचिव कॉम्रेड सचिन मोतकुरवार यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले, “चोखेवाडाते येडंमपल्लीपर्यंतच्या गावांना रस्ता मिळणे हा कोणताही विशेष उपकार नसून नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित मूलभूत प्रश्न आहे. प्रशासनाने आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी.”
या संपूर्ण मार्गाचे तातडीने सर्वेक्षण करून रस्त्याची लांबी, रुंदी व अंदाजपत्रक तयार करावे. नदी, नाले व ओढ्यांवर आवश्यक ठिकाणी कायमस्वरूपी पूल व लहान पुलांचे बांधकाम मंजूर करावे, तसेच उपलब्ध शासकीय योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून रस्त्याला प्रशासकीय मान्यता द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
“जंगल पायवाट नव्हे, हक्काचा डांबरी रस्ता द्या!” अशी भूमिका घेत प्रशासनाने या प्रश्नावर कालबद्ध कार्यवाही न केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा CPI ने दिला.
यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड सचिन मोतकुरवार, जिल्हा सहसचिव, कॉम्रेड सुरज जककुलवार, जिल्हा सदस्य, कॉम्रेड रितेश जोई, कॉम्रेड तेजस गुज्जलवार, देवराम नरोटे, परशुराम नैताम, दशरथ पोटावी, मनकु मटामी तसेच विविध गावांतील नागरिक व CPI कार्यकर्ते उपस्थित होते.

