
वन्यप्राण्यांचा धोका, अपुऱ्या साधनसुविधा आणि कायदेशीर जबाबदारीचा मुद्दा; कामातून वगळण्याची मागणी
प्रलय सहारे
भेंडाळा/चामोर्शी : शेतकऱ्यांच्या पिकांची डिजिटल नोंद करण्यासाठी सुरू असलेल्या ‘ई-पिक पाहणी’च्या कामातून महसूल सेवक (कोतवाल) यांना वगळावे, अशी जोरदार मागणी महसूल सेवक संघटनेच्या चामोर्शी तालुका शाखेने केली आहे. याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दि. २७ ऑगस्ट रोजी चामोर्शी तहसीलदारांना निवेदन सादर केले.

निवेदनानुसार, चामोर्शी तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतजमिनी घनदाट जंगलाने व्यापलेल्या परिसरात आहेत. अशा ठिकाणी ई-पिक पाहणी करताना वन्यप्राण्यांचा सामना होण्याची शक्यता असून साप, विंचू यांसह वन्यप्राण्यांपासून जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, असा संघटनेचा दावा आहे. प्रत्यक्ष पाहणीदरम्यान एखादी दुर्घटना घडून जीवितहानी झाल्यास संबंधित कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर मोठे संकट ओढवू शकते, अशी भीतीही निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
‘सुरक्षा कोण देणार?’; विमा आणि नुकसानभरपाईची मागणी
ई-पिक पाहणी करताना नैसर्गिक किंवा आकस्मिक वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात कर्मचारी जखमी अथवा मृत झाल्यास जबाबदारी कोणाची? असा गंभीर सवाल संघटनेने उपस्थित केला आहे. अपघात झाल्यास किमान ५० लाख रुपयांची विमा पॉलिसी देण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
स्मार्टफोन, इंटरनेट अन् तांत्रिक प्रशिक्षणाचा अभाव
महसूल सेवक हे मानधनी कर्मचारी असून ई-पिक पाहणीसाठी आवश्यक असलेल्या स्मार्टफोन, इंटरनेट भत्ता किंवा तांत्रिक प्रशिक्षणाची पुरेशी सुविधा शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेली नाही, असा आक्षेप संघटनेने घेतला आहे. अनेक महसूल सेवकांकडे Android फोन असले तरी आवश्यक अॅप चालविण्यासाठीच्या तांत्रिक बाबी आणि आर्थिक खर्चाचा भार स्वतःच्या खिशातून करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद आहे.
‘नोंदीतील चूक झाली तर जबाबदारी आमची का?’
ई-पिक पाहणीतील नोंदीवर शेतकऱ्यांचे कर्ज, पीक विमा आणि शासकीय मदत अवलंबून असते. त्यामुळे नोंद करताना काही त्रुटी राहिल्यास भविष्यात कायदेशीर जबाबदारी महसूल सेवकांवर येण्याची भीती संघटनेने व्यक्त केली आहे. महसूल सेवक हे तांत्रिकदृष्ट्या सक्षम किंवा ई-पिक पाहणीचे कायदेशीर अधिकार असलेले कर्मचारी नसल्याने त्यांच्यावर ही जबाबदारी लादू नये, अशी मागणी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांची जबाबदारी शेतकऱ्यांचीच; महसूल सेवकांना सक्ती नको
संघटनेने स्पष्ट केले आहे की, ‘माझी शेती, माझा पीक पेरा’ या संकल्पनेनुसार पीक पेरा भरण्याची जबाबदारी स्वतः शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे चामोर्शी तालुक्यातील महसूल सेवकांना ई-पिक पाहणीचे काम सक्तीने देण्यात येऊ नये, अशी थेट मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास नियमबाह्य कामाला विरोध करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही, असा इशाराही संघटनेने दिला आहे.
महसूल सेवक संघटनेच्या या भूमिकेमुळे ई-पिक पाहणीच्या अंमलबजावणीवर प्रशासनासमोर नवे आव्हान उभे राहिले असून, तहसील प्रशासन आता या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

