
आरमोरी विधानसभा क्षेत्रातील विकासकामे, जनतेच्या समस्या आणि संघटनात्मक विषयांवर दिल्लीमध्ये सकारात्मक चर्चा

नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली,दि.१३ ऑक्टोबर: अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभेचे खासदार मुकुल वासनिक यांची आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या विकासाशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांसह जनतेच्या समस्या, संघटनात्मक बांधणी आणि सद्य राजकीय घडामोडींवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

आरमोरी विधानसभा क्षेत्रातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, विकासकामांना गती देण्याची गरज तसेच जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर यावेळी विचारविनिमय करण्यात आला. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणे आणि जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यांचा पाठपुरावा करणे, या भूमिकेतून ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविणे, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय राखणे आणि जनहिताच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करणे, यासंदर्भातही यावेळी चर्चा झाली.
या सदिच्छा भेटीप्रसंगी गटनेते विकास प्रधान, सागर वाढई, स्वप्नील मिसार आणि गौरव शिलार उपस्थित होते.
जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्धता, या भूमिकेतून आमदार रामदास मसराम यांचे प्रयत्न सुरू असल्याचे या भेटीच्या निमित्ताने अधोरेखित झाले.

