
एटापल्ली : श्री सार्वजनिक नवयुवक दुर्गोत्सव मंडळ, एटापल्ली यांच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य मनोरंजन पार्कचे उद्घाटन एटापल्लीच्या नगराध्यक्षा तथा मंडळाच्या माजी महिला अध्यक्ष रेखा मोहुर्ले यांच्या हस्ते करण्यात आले.

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांना मनोरंजनाची पर्वणी अनुभवता यावी, तसेच लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, या उद्देशाने मंडळाच्या वतीने मनोरंजन पार्क उभारण्यात आले आहे. या पार्कमध्ये झुले, आकाश पाळणा, ब्रेक डान्स, ड्रॅगन ट्रेन, ड्रॅगन बोट, क्रॉस झुला यांसह विविध मनोरंजनाची साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्याचबरोबर खाद्यपदार्थांची दुकाने आणि विविध व्यावसायिक दुकानेही थाटण्यात आली असून, नागरिकांना मनोरंजनासोबतच खरेदी व खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्षा रेखा मोहुर्ले यांनी मनोरंजन पार्कची पाहणी केली. नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांना आनंददायी वातावरणात एकत्र येण्याची संधी मिळत असून, अशा उपक्रमांमुळे शहरातील उत्सवी वातावरण अधिक उत्साहपूर्ण होत आहे.

नागरिकांना मनोरंजन पार्कला भेट देण्याचे आवाहन
श्री सार्वजनिक नवयुवक दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने एटापल्ली शहरासह परिसरातील नागरिकांनी, महिला-भगिनींनी, युवकांनी आणि बालगोपालांनी आपल्या कुटुंबीयांसह मनोरंजन पार्कला आवर्जून भेट द्यावी व या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवरात्रोत्सवाचा आनंद द्विगुणित करावा आणि स्थानिक व्यावसायिकांनाही सहकार्य करावे, असे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी मंडळाचे जनार्धन नल्लावार, राघवेंद्र सुल्वावार, संपत पैडाकुलवार, अनिकेत मामिडवार, शशांक नामेवार, तनुज बल्लेवार, अक्षय गहेरवार, महेंद्र सुल्वावार, आदित्य चिप्पावार, रोहित मोहुर्ले, प्रवीण मुनरत्तीवार, कार्तिक दासरवार, यश जाजुलवार आदी उपस्थित होते.

