
BDDS पथकाची दुहेरी कांस्यपदकांची कमाई; अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यासाठी गडचिरोली परिक्षेत्राची निवड!

जिल्हा प्रतिनिधी |गडचिरोली : पुणे येथे आयोजित २१ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात गडचिरोली पोलीस दलाच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकाने (BDDS) उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरावर गडचिरोलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. घातपातविरोधी तपासणी स्पर्धेतील ग्राउंड सर्च (Ground Search) आणि रूम सर्च (Room Search) या दोन्ही प्रकारांत कांस्यपदके पटकावत पथकाने आपल्या कौशल्याची, अचूकतेची आणि तत्परतेची प्रभावी छाप उमटवली.
पंकज हुलके आणि धम्मदीप मेश्राम यांची चमकदार कामगिरी!

या स्पर्धेत गडचिरोली पोलीस दलाच्या BDDS पथकातील पोहवा/२४८९ पंकज हुलके आणि पोअं/९३९३ धम्मदीप मेश्राम यांनी उत्कृष्ट कामगिरी करत दोन्ही प्रकारांत कांस्यपदके मिळवली. घातपातविरोधी तपासणीसारख्या अत्यंत संवेदनशील आणि कौशल्यपूर्ण क्षेत्रात त्यांनी दाखवलेली दक्षता व व्यावसायिक क्षमता गडचिरोली पोलीस दलासाठी अभिमानास्पद ठरली आहे.
अखिल भारतीय स्पर्धेसाठी गडचिरोली परिक्षेत्राची निवड!
या यशात आणखी एक महत्त्वाची भर म्हणजे घातपातविरोधी तपासणी स्पर्धेत गडचिरोली परिक्षेत्राने तिसरा क्रमांक पटकावला. या कामगिरीच्या बळावर परिक्षेत्राची अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यासाठी निवड निश्चित झाली आहे. त्यामुळे राज्यस्तरीय यशानंतर आता राष्ट्रीय स्तरावरही गडचिरोली पोलीस दलाला आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.
पोलीस अधीक्षकांकडून जवानांचे अभिनंदन!
या उल्लेखनीय यशाबद्दल पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी पदकविजेत्या जवानांचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले. तसेच आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा देत गडचिरोली पोलीस दलाच्या यशस्वी वाटचालीला प्रोत्साहन दिले.
राज्यस्तरीय स्पर्धेत दोन कांस्यपदके आणि अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यासाठी निवड, या दुहेरी यशामुळे गडचिरोली पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. कौशल्य, तत्परता आणि उत्कृष्टतेच्या जोरावर गडचिरोली पोलिसांनी राज्यस्तरावर आपली यशस्वी छाप उमटवली असून, आता राष्ट्रीय स्तरावरील कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

