
प्रतिनिधी|प्रलय सहारे

भेंडाळा/चामोर्शी : तालुक्यातील रामाळा उपकेंद्रातील आरोग्यसेवा सध्या मनुष्यबळाअभावी अडचणीत आली असून, येथे कार्यरत असलेल्या ANM कु. के. एस. लटारे यांची रामाळा उपकेंद्रात कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते लच्छमा विस्तारी शिरगावर, रामाळा यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनानुसार, ANM कु. के. एस. लटारे या मागील अनेक वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र भेंडाळा येथे तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत होत्या. महिला कर्मचारी प्रसूती रजेवर गेल्यामुळे त्यांच्या जागी कु. लटारे यांना पाठविण्यात आले होते. मात्र संबंधित महिला कर्मचारी प्रसूती रजेतून परतल्यानंतरही कु. लटारे यांना त्यांच्या मूळ रामाळा उपकेंद्रात पुन्हा रुजू करण्यात आलेले नाही.

दरम्यान, रामाळा उपकेंद्रातील CHO कु. तेजस्विनी साखरे यादेखील मागील सुमारे ९ महिन्यांपासून रजेवर असल्याने उपकेंद्रातील आरोग्य व्यवस्था मोठ्या अडचणीत सापडली आहे. त्यामुळे रामाळा परिसरातील नागरिकांना आरोग्यसेवेसाठी मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून विविध आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. तसेच रात्रीच्या वेळी एखाद्या गर्भवती महिलेला प्रसूतीकळा सुरू झाल्यास किंवा अन्य गंभीर आरोग्य समस्या उद्भवल्यास उपकेंद्रात कर्मचारी उपलब्ध नसल्याने रुग्णांना तातडीची सेवा मिळण्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
रामाळा व मोहाळी या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपकेंद्रात नियमित आरोग्य कर्मचारी उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे ANM कु. के. एस. लटारे यांना तातडीने रामाळा उपकेंद्रात पूर्ववत रुजू करून कायमस्वरूपी सेवा देण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
या मागणीकडे आरोग्य विभागाने तातडीने लक्ष न दिल्यास रामाळा व मोहाळी या दोन्ही गावांमध्ये आरोग्यसेवेची गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असून, त्याची संपूर्ण जबाबदारी आरोग्य विभागावर राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा गंभीर प्रश्न असल्याने प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रामाळा उपकेंद्रात नियमित ANM कर्मचारी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

