
गावकऱ्यांनी वाहन अडविल्यानंतर चालक घटनास्थळावरून पसार; चामोर्शी पोलिसांकडून तपास सुरू

चामोर्शी : चामोर्शी येथून लखमापूर बोरी मार्गे चार जनावरांची वाहतूक करणारे वाहन गावकऱ्यांनी अडवून पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना आज सायंकाळी लखमापूर बोरी येथे घडली. गावकऱ्यांनी वाहन अडविल्यानंतर चालक वाहनातून उतरून घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चामोर्शी येथून चार जनावरे घेऊन एक वाहन लखमापूर बोरीच्या दिशेने जात होते. दरम्यान, लखमापूर बोरी येथे या वाहनाने एका इसमाला कट मारल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर वाहन वेगाने पुढे जात असताना गावातील नागरिकांनी सतर्कता दाखवत MH34TCQ2316 क्रमांकाचे वाहन अडविले.

मात्र, गावकऱ्यांनी वाहन अडविल्याचे लक्षात येताच चालक वाहनातून उतरून पळून गेला. घटनेची माहिती मिळताच चामोर्शी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संबंधित वाहन ताब्यात घेतले असून, वाहनातील चार जनावरांच्या वाहतुकीबाबत पुढील तपास सुरू केला आहे.
चालक फरार; जनावरांच्या वाहतुकीमागील नेमके कारण काय?
या प्रकरणात वाहनातून जनावरांची वाहतूक कोणत्या उद्देशाने केली जात होती, यासह इतर बाबींचा तपास होणे अपेक्षित आहे. फरार चालकाचा शोध घेणे तसेच वाहन आणि जनावरांशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली चामोर्शी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. तपासातून या घटनेतील अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

