
१३ कोटींचे व्यापारी संकुल मद्यपींच्या विळख्यात!

चार-पाच वर्षांपासून संकुलाची दुरवस्था; सुशिक्षित बेरोजगारांना गाळे देण्याची इंटकची आक्रमक मागणी
जिल्हा प्रतिनिधी! चेतन कामडे..

मूल शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल सध्या दुर्लक्षाच्या गर्तेत सापडले आहे. व्यापारी गाळे वापराविना पडून असल्याने या संकुलाची अवस्था दयनीय झाली असून, परिसरात दारूच्या बाटल्या, सिगारेटचे अवशेष आणि फुटलेल्या काचा आढळून येत आहेत. त्यामुळे कोट्यवधींचे हे संकुल मद्यपी आणि असामाजिक तत्त्वांचा अड्डा बनत असल्याचा गंभीर आरोप करत, संकुलाची तातडीने दुरुस्ती करून गाळे स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना प्राधान्याने देण्यात यावेत, अशी आक्रमक मागणी भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) संघटनेने केली आहे.
इंटकच्या मूल शहर महिला अध्यक्ष आरती मोटघरे आणि मूल तालुका सचिव प्रशांत झुरमुरे यांनी नगर परिषद क्षेत्रातील या व्यापारी संकुलाची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान इमारतीच्या फुटलेल्या काचा, परिसरात विखुरलेल्या दारूच्या बाटल्या आणि सिगारेटचे अवशेष दिसून आल्याचे त्यांनी सांगितले. रात्रीच्या वेळी येथे अल्पवयीन मुले गांजा आणि दारूचे सेवन करत असल्याची बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली. या प्रकारामुळे परिसराच्या सुरक्षिततेचा आणि सार्वजनिक मालमत्तेच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
🔴१३ कोटींचा निधी खर्च; तरीही संकुल धूळखात!
मा. आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांतून विशेष अनुदानांतर्गत तब्बल १३ कोटी ७२ लाख २३ हजार ६१० रुपये खर्च करून या भव्य व्यापारी संकुलाची उभारणी करण्यात आली. मोठ्या थाटामाटात उद्घाटन होऊन चार ते पाच वर्षे उलटली, तरी संकुलाचा अपेक्षित व्यावसायिक वापर सुरू झालेला नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. शहरातील तरुण रोजगाराच्या संधींच्या शोधात असताना एवढ्या मोठ्या निधीतून उभारलेली वास्तू वापराविना पडून राहणे, ही बाब प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे.
🔴बेरोजगारांना संधी द्या, अन्यथा निधीचा उपयोग काय?
एका बाजूला सुशिक्षित बेरोजगार तरुण रोजगारासाठी संघर्ष करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला सार्वजनिक निधीतून उभारलेले व्यापारी संकुल दुर्लक्षित अवस्थेत आहे. या विसंगतीवर इंटकने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संकुलाची तातडीने दुरुस्ती करून स्वच्छता, सुरक्षितता आणि देखभालीची योग्य व्यवस्था करावी. तसेच व्यापारी गाळ्यांचे वाटप करताना मोठ्या व्यापाऱ्यांपेक्षा स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना प्राधान्य द्यायला पाहिजे , अशी मागणी संघटनेने केली आहे.
… News Jagar Chandrpur District…

