
पर्यटकांनी कचरा न टाकण्याचे आवाहन
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली,दि.२३ ॶॉगस्ट : गडचिरोली जिल्ह्याचे नैसर्गिक वैभव आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या टिपागड येथे निसर्गसंवर्धनाचा अनोखा संदेश देत रविवारी २३ ॶॉगस्ट रोजी भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. भाजयुमो आणि सोबे टुरिझम (ट्रायबी टूर्स) यांच्या संयुक्त विद्यमाने, आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पडला.

टिपागडच्या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येथे येतात. मात्र, पर्यटकांकडून खाद्यपदार्थांचे प्लास्टिक, पिशव्या, बाटल्या व अन्य कचरा परिसरातच टाकला जात असल्याने या निसर्गसंपदेचे सौंदर्य विद्रूप होत आहे. ही बाब लक्षात घेऊन ‘निसर्गाचा आनंद घ्या, मात्र निसर्ग अस्वच्छ करू नका’ हा संदेश देण्यासाठी स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले.
या अभियानात गडचिरोली आणि धानोरा परिसरातील जवळपास दीडशे उत्साही युवक, भाजयुमोचे पदाधिकारी-कार्यकर्ते आणि निसर्गप्रेमी नागरिकांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे सकाळपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाची तमा न बाळगता आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्यासह सर्व सहभागी बाईकने टिपागडच्या पायथ्यापर्यंत पोहोचले.
पायथ्याशी वाहने उभी करून सर्वांनी पायी पहाड चढत टिपागड गाठले. त्यानंतर परिसराची पाहणी करून पर्यटकांनी टाकलेला प्लास्टिक कचरा, बाटल्या, खाद्यपदार्थांचे अवशेष आणि अन्य कचरा मोठ्या प्रमाणावर गोळा करण्यात आला. जमा झालेल्या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावत टिपागड स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
स्वच्छता अभियानानंतर सहभागी युवकांनी निसर्गरम्य वातावरणात नैसर्गिक पद्धतीने बनविलेल्या भोजनाचा आस्वाद घेतला. पावसाच्या सरी, डोंगररांगांचे विहंगम दृश्य आणि स्वच्छतेचा संदेश यामुळे या उपक्रमाला वेगळेच स्वरूप प्राप्त झाले.
विशेष म्हणजे यापूर्वीही मूतनुरच्या पहाडावर अशाच पद्धतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते.
निसर्ग पर्यटनस्थळांचे सौंदर्य जपण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असून, पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद घेताना ‘कचरा स्वतःसोबत आणा आणि स्वतःसोबत परत घेऊन जा’, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
टिपागडच्या स्वच्छतेसाठी युवकांनी घेतलेला पुढाकार हा केवळ एक दिवसाचा उपक्रम न राहता निसर्गसंवर्धनाची चळवळ बनावी, अशी भावना उपस्थित निसर्गप्रेमींनी व्यक्त केली.

